Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कैवल्यसम्राट ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याचे फलटणमध्ये शाही स्वागत
ऐक्य समूह
Friday, July 05, 2019 AT 11:09 AM (IST)
Tags: re1
5फलटण, दि. 4 :
दक्षिण काशीत आला माउलींचा मेळा।
श्रीरामाच्या नगरीत विसावला भक्तीचा मेळा॥
येथे मंत्रमुग्ध होतो वारकरी भोळा।
स्नेहाने वाढतो माउलींच्या भक्तांचा मेळा॥
महानुभाव आणि जैन धर्मियांची दक्षिण काशी त्याचप्रमाणे अन्य धर्मियांची मोठमोठी पुरातन मंदिरे असलेली आधुनिक काशी म्हणून ज्या शहराचा उल्लेख होतो त्या फलटण शहरात कैवल्यसम्राट ज्ञानराजांच्या पालखी सोहळ्याचे गुरुवारी सायंकाळी शाही स्वागत करण्यात आले. टाळ मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात सायंकाळी 5.30 वाजता माउलींच्या वैभवी लवाजम्याचे शहराच्या वेशीवर नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, मुख्याधिकारी प्रसाद काटकर आणि नगरसेवक/नगरसेविका यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी आणि फलटणकरांनी भक्तिभावाने आणि उत्साहात स्वागत केले.  
दरम्यान, सोहळा पालखी तळाकडे जाताना भाविकांनी जिंती नाका, सद्गुरु हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक येथे माउलींचे स्वागत केले. त्यानंतर मुधोजी मनमोहन राजवाडा आणि श्रीराम मंदिर येथे नाईक-निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्यावतीने  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर, सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर, देवस्थान ट्रस्टचे महादेव खंडेराव यादव व दशरथ खंडेराव यादव, डॉ. पार्श्‍वनाथ राजवैद्य, अविनाश जोशी, डॉ. विलासराव रसाळ, डॉ. रवींद्र जगताप, डॉ. प्रणव राजवैद्य, नगरसेवक किशोरसिंह नाईक-निंबाळकर, तुषार नाईक-निंबाळकर, श्री रामाचे परंपरागत पुजारी अमोद पेटकर, देवघर पुजारी, शामराव निकम,  महादेवराव माने,  अमोल उर्फ आबा पवार, शंतनु रुद्रभटे, जगन्नाथ उर्फ भाऊ कापसे यांनी माउलींचे परंपरागत पध्दतीने स्वागत करुन दर्शन घेतले. त्यानंतर सोहळा गजानन चौक, म. फुले चौक, सफाई कामगार कॉलनी, गिरवी नाका, शहर पोलीस ठाणे या मार्गाने येथील प्रशस्त पालखी तळावर पोहोचला. फलटण शहराला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. सद्गुरु हरिबुवा महाराज, सद्गुरु प.पू. उपळेकर महाराज यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या नगरीत महानुभाव धर्मसंस्थापक चक्रपाणी महाराजांचे जन्मस्थान असून साध्वी सगुणामाता आईसाहेब महाराज यांनी काही काळ या संस्थानचा राज्यकारभार पाहिला. त्याच परंपरेतील राणीसाहेब श्रीमंत सौ. लक्ष्मीदेवी नाईक-निंबाळकर या माउली भक्त होत्या. एकेवेळी विमानातून जाताना ज्ञानेश्‍वरी वाचत असताना विमानाला झालेल्या छोट्याशा अपघातातून त्या बचावल्या त्यावेळी त्यांच्या हातातील ज्ञानेश्‍वरी ग्रंथाचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र फलटण संस्थानने आणि आजच्या नाईक-निंबाळकर घराण्याने ज्ञानेश्‍वरीची ती प्रत एक ठेवा म्हणून आजही जतन करुन ठेवली आहे. या घराण्याची माउलींवर अपार श्रध्दा आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: