Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वैष्णवांच्या मांदियाळीसह माउलींचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
ऐक्य समूह
Saturday, July 06, 2019 AT 11:31 AM (IST)
Tags: re1
औदुंबर भिसे
5बरड, दि. 5  :
उंच पताका झळकती ।
टाळ, मृदुंग वाजती ॥
आनंदे प्रेमे गर्जती ।
भद्र जाती विठ्ठलाचे ॥
 भागवत धर्माची पताका उंचावत टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या माउलींसह लाखो वैष्णवांचा मेळा शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील शेवटच्या बरड मुक्कामी विसावला.  शनिवार 6 रोजी साधूबुवांच्या ओढ्यावरील धार्मिक विधीनंतर हा सोहळा धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
पहाटे पालखी सोहळा प्रमुख  योगेश देसाई  यांच्या हस्ते माउलींची पूजा व अभिषेक झाला. माउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळी 6.30 वाजता हा सोहळा बरड मुक्कामासाठी मार्गस्थ झाला.
ज्ञानेश्‍वर मंदिर येथे नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्यावतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक, श्रीराम साखर कारखाना, श्रीराम बझार, श्रीराम एज्युकेशन संस्था यांच्यावतीने  स्वागत स्वीकारून  सोहळ्याने फलटण नगरीचा निरोप घेतला.
पालखी सोहळा वटवृक्षाच्या गर्द झाडीतून वाटचाल करीत सकाळच्या न्याहरीसाठी 9 वाजता विडणी येथे पोहोचला. शेतामध्ये वारकर्‍यांनी सकाळची न्याहरी उरकली. विडणी ते पिंपरद या वाटचालीत वारकर्‍यांच्या स्नानासाठी पिंपरदचे प्रगतशील बागायतदार बाळासाहेब घनवट,   बाळासाहेब बोराटे व शामराव शिंदे यांनी शॉवरची सोय केली होती. या विदेशी पद्धतीच्या स्नानाने वारकरी सुखावून गेले. सोहळा  नैवेद्य व भोजनासाठी दुपारी 12 वाजता पिंपरद येथे पोहोचला. पिंपरद येथे  सेवेकरी, पुजारी व कर्मचारी यांच्यावतीने माउलींना पनीर, आम्रखंड, पुरी, भाजी, दालफ्राय, पुलावा भात आदी पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून अन्नदान करण्यात आले.  दुपारी दीड वाजता हा सोहळा भोजन व विश्रांतीनंतर निंबळक फाटा मार्गे सायंकाळी बरड येथे पोहोचला. पंढरी समीप आल्याने वारकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. असंख्य वारकरी फलटणहून शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ झाले. त्यांनी शिखर शिंगणापूर येथे शंभू महादेवाचे दर्शन घेतले व ते पुन्हा बरड येथे वारीत सहभागी झाले. सायंकाळी बरड येथे सोहळा पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. रात्रभर बरडसह परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
 माउलींचा आज सोलापूर जिल्ह्यात प्रवेश
आळंदीहून निघालेला संतश्रेष्ठ श्री ज्ञानराजांचा पालखी सोहळा
शनिवार  दि.6 रोजी सकाळी 11 वाजता आपल्या वैभवी लवाजम्यासह धर्मपुरी येथे सोलापूर जिल्ह्यात प्रवेश  करणार आहे. सोहळ्यासमवेत रथापुढे 27 दिंड्या तर रथामागे जवळपास 250 दिंड्या आहेत. सोहळ्यात सुमारे दोन लाख वारकरी सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्हा प्रशासनाने या सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी केली आहे.  आरोग्य, पाणीपुरवठा, सुरक्षा, वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यात
आली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: