Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ
ऐक्य समूह
Saturday, July 06, 2019 AT 11:32 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 5 : सलग गेले आठ दिवस संततधार सुरू असणारा पावसाचा जोर शुक्रवारी गतवर्षीच्या तुलनेत सातारा तालुक्यात मंदावला असला तरी गुरुवारी रात्री सातारा येथील बोगद्यानजीक असणारी छोटीशी दरड कोसळल्याची घटना घडली. मात्र त्यात सुदैवाने जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. दरम्यान, पोवई नाका येथील उतारावरील रस्त्यावर चिखल झाल्याने घसरगुंडी होऊन दुचाकी वाहनचालकांचे अपघात होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या आहेत. या ठिकाणची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
आठ दिवसापूर्वी सातारा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. सतत संततधार पाऊस कोसळल्यामुळे कास जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाला. परळी भागातील उरमोडी धरणासह ठोसेघर येथील जगमीन जलाशय, पांगारे येथील जलाशयात चांगला पाणीसाठा होऊ लागला आहे. शुक्रवारी सकाळपासून सातारा तालुक्यात पावसाचा जोर मंदावल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या दोन दिवस अशीच परिस्थिती राहिली तर वापसा येऊन शेतकरी पेरणीलाप्रारंभ करणार आहेत. पेरणीपूर्व मशागत पूर्ण झाल्यामुळे पावसाचा जोर कमी होण्याची वाट शेतकरी पाहत होता. गुरुवारी रात्री सातारा शहरातील बोगद्या नजीक दरड कोसळली. मात्र या दुर्घटनेत कोणतेही नुकसान झाले नाही. संबंधित विभागाच्या कर्मचार्‍यांनी आज सकाळी रस्त्यावर आलेले दगड हटवल्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला नाही. दरम्यान साताराशहरातील पोवई नाक्यावरून जिल्हा रुग्णालयाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात रस्त्याला खड्डे पडून त्यामध्ये पावसाच्या पाण्याने माती आल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे. गेले आठ दिवस संततधार पाऊस पडत असल्यामुळे या ठिकाणी चिखलाने दुचाकी वाहनांची घसरगुंडी होऊ लागली आहे. त्यामुळे छोटे छोटे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित विभागाने चिखल झालेल्या ठिकाणी रस्त्यावरील खड्डे भरून घेऊन त्या ठिकाणी तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी होऊ लागली आहे.
जगमीन धरण भरले
5सातारा-जावली मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणून विकासाचा धडाका लावणार्‍या आ. श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाणीसाठवण बंधारे, छोटे- मोठे पाझर तलाव बांधून मतदारसंघात जलक्रांतीही घडवली आहे. सातारा तालुक्यातील जगमीनगावाजवळ आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून छोटे धरण बांधण्यात आले असून नुकत्याच झालेल्या पावासात हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणामुळे जगमीन, चाळकेवाडी आणि परिसरातील वाड्या वस्त्यांचा सिंचनाचा प्रश्‍न सुटल असून पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
चाळकेवाडी, जगमीन व आसपासची गावे डोंगराळ भागात आहेत. या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असले तरी पाणीसाठा होत नसल्याने उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळत नसते. हीच समस्या ओळखून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दूरदृष्टीतून जगमीन येथे छोटे धरण बांधण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून या धरणाला जिल्हा नियोजन समितीमधून निधी मंजूर झाला. धरणाचे काम सुरू झाले आणि गेल्या 10 ते 12 दिवसांपूर्वीच धरणाचे काम 95 टक्के पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जगमीन धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणातून पाणी ओसंडून वाहत आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 25 सहस्त्र घनमीटर असून धरणातील पाण्यामुळे सुमारे 30 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तसेच जगमीन, चाळकेवाडी आणि परिसरातील जमिनीच्या पाणीपातळीतही मोठी वाढ होणार असून विहिरींनाही मुबलक पाणीसाठा होणार आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या कल्पक आणि दूरदृष्टीतून जगमीन धरणाची उभारणी झाली. या धरणामुळे जगमीन, चाळकेवाडी परिसरात जलक्रांती घडली असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडली आहे. ठोसेघर येथील धबधबा पाहण्यासाठी येणार्‍या पर्यटकांना नवीन बांधलेले जगमीन धरण हे एक आकर्षण ठरणार आहे. सिंचनाचा प्रश्‍न तर सुटलाच असून परिसराच्या सौंदर्यातही भर पडल्यामुळे या भागातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण असून ग्रामस्थ आ. शिवेंद्रसिंहराजे यांना धन्यवाद देत आहेत.  
वेण्णा लेक ओसंडून वाहू लागला
5महाबळेश्‍वर : सध्या महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्‍वरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून गेले आठवड्यात येथील धुवाँधार पावसामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. वेण्णा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.  सांडव्यावरून वाहणार्‍या जलधारांचे मनोहारी दृश्य पहावयास मिळत आहे. आज त्याचा आनंद स्थानिकांसह येथे फिरवायला आलेल्या पर्यटकांनी घेतला. यावर्षी या चेरापुंजीत मान्सून पावसाचे उशिरा आगमन झाले. जून महिन्याचे पहिले दोन आठवडे अगदी कोरडेच गेले. मात्र नंतर पावसाचे दमदार आगमन झाले. दि. 27 जूनपासून तो सलग बरसत आहे. आजपर्यंत एकूण या वर्षी 1339.3 मिमी म्हणजे सुमारे 52 इंच पाऊस झाल्याची नोंद आहे. गतवर्षी यावेळेपर्यंत येथे 1245. 7 मिमी पाऊस झाला होता.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: