Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुसळधार पावसाने सातारकरांची दैना
ऐक्य समूह
Tuesday, July 09, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: lo2
अनेक इमारतींमध्ये पाणी घुसले, रस्ता उखडला, भिंत पडली
5सातारा, दि. 8 : सातारा शहरात पडत असलेल्या सलग मुसळधार पावसाने नागरिकांची दैना उडाली असून पावसाचे पाणी अनेक इमारतींमध्ये घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. रस्ता उखडणे, भिंत पडणे हे सत्र सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सातारा - फलटण मार्गावर कॅनॉलवर असणार्‍या पुलाच्या पिलर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सातारा शहरात बारा महिने तेरा काळ उखडलेल्या रस्त्यांमुळे नागरिक हैराण झालेले असतात. नवीन तयार झालेला रस्ता काही दिवसांतच पूर्वपदावर येतो. सातार्‍यातील एकही रस्ता विनाखड्ड्याचा नसतो. त्यात प्राधिकरणाच्या खुदाईमुळे रस्त्यांची पूर्णत: वाताहत झालेली आहे. सातारा पालिकेतील रस्ते कंत्राटदार रस्ता तयार करतात. मात्र रस्ता खराब झाल्यानंतर ते याकडे ढुंकूनही पाहत नाही.
गेल्या वर्षापासून पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटरचे काम सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण सातार्‍याचीच नाकाबंदी झालेली आहे. नक्की जायचे कुठून हा प्रश्‍न स्थानिक नागरिकांनाच पडत असल्याने बाहेरून येणार्‍या नागरिकांची तर परिस्थिती विचारायलाच नको! जे रस्ते 50 वर्षांपूर्वी होते, तेच रस्ते आताही आहेत. त्या रस्त्यांचे रुंदीकरणही अद्याप झालेले नाही. त्यात गेल्या 15 वर्षांमध्ये चारचाकी व दुचाकींची संख्याही वारेमाप वाढली. परंतु रस्ते मात्र जैसे थे च राहिल्याने सातारच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याचीच झालेली आहे. त्यात पोलिसांच्या एकेरी वाहतुकी-मुळे भर पडली आहे. या अडचणींमध्ये सातारा शहरात पडत असलेल्या मुसळधार पावसाने वाढ केली आहे. सलग सततच्या पावसामुळे शहरातील अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानदारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. मोटर लावूनही पाणी निघत नसल्यामुळे दुकाने बंद ठेवण्याची नामुष्कीजनक  वेळ त्यांच्यावर आली आहे. मुसळधार पावसामुळे झाडे पडणे, भिंती पडण्याचे सत्र सुरू झाले असल्यामुळे नागरिकांच्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाने ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचले आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे अनेक वाहनचालकांची गोची होत आहे.
पोवई नाक्यावरील भाजी मंडईमध्ये पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या ठिकाणी भाजी आणण्यासाठी जाताना नाकाला रूमाल लावूनच जावे लागत आहे. पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे शेतकरीही हतबल झाले आहेत. शेतामध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यामुळे वापसा येण्यासाठी फार मोठा काळ लागणार आहे. बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील अनेक इमारतींच्या बेसमेंटमध्ये पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवली आहे. करंजे येथील सैनिक भवन या इमारतीची भिंत कोसळली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: