Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 11:04 AM (IST)
Tags: mn4
5मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) : पद्मसिंह पाटील यांनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती, अशी साक्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय न्यायालयात दिली. पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे माझ्या तक्रारीची कुणीही दखल घेत नाही. मला मिळालेल्या धमकीबाबत मी मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांकडे दाद मागितली होती, असेही त्यांनी म्हटले आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सरकारी साक्षीदार म्हणून मुंबई सत्र न्यायालयातील सीबीआय न्यायालयात दाखल झाले होते. त्याचवेळी त्यांनी हा आरोप केला
तेरणा साखर कारखाना भ्रष्टाचार प्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात अनेक पुरावे सादर केले होते. तरीही कोणतीही कारवाई झाली नाही. याचा निषेध म्हणून मी पद्मश्री, वृक्षमित्र हे पुरस्कारही परत केले. मात्र कशाचाही उपयोग झाला नाही. शेवटचा उपाय म्हणून मी उपोषणाला बसलो, त्यानंतर सरकारने पी. बी. सावंत आयोगाकडे भ्रष्टाचाराची चौकशी सोपवण्यात आली.
या चौकशीत पद्मसिंह पाटील दोषी ठरल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला. याच गोष्टीचा राग मनात ठेवून पद्मसिंह पाटील यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली होती, असाही आरोप अण्णा हजारे यांनी केला. मी तक्रार मागे घ्यावी म्हणून माझ्यावर दबावही टाकण्यात आला होता. एकदा माझ्या कार्यालयात येऊन पद्मसिंह पाटील यांच्या माणसांनी माझ्या कार्यकर्त्याकडे कोरा चेक सोपवला आणि सांगितले हवी ती रक्कम टाका अशी ऑफर मला देण्यात आली, असेही अण्णा हजारे यांनी न्यायालयात सांगितले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: