Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तेरा नगरसेवकांचा नगराध्यक्षांच्या विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे अविश्‍वास ठराव दाखल
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: re1
5पाचगणी, दि. 9 : आ. मकरंद पाटील यांच्या करिष्म्याने पाचगणीत राजकीय भूकंप झाला आहे. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून सत्ताधारी गटातील 4 नगरसेवकांसह तब्बल 13 नगरसेवकांनी नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात अविश्‍वास ठराव दाखल केला आहे.
दरम्यान, नगराध्यक्षांंनी पालिकेत मनमानी, एकाधिकारशाही चालवली आहे. या मनमानीने पालिकेचे आर्थिक नुकसान केले असल्याचा आरोप करत पालिकेला स्वतःच्या स्वार्थासाठी अडचणीत आणणार्‍या नगराध्यक्षांना पदमुक्त करावे, अशी मागणी शिवसेनेचे पाचगणी शहरप्रमुख संजय कासुर्डे यांनी पत्रकार परिषदेत केली. थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षा लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी गेल्या 2.5-3 वर्षात सत्तेचा अमाप प्रमाणात गैरवापर केला आहे. त्यांनी मनमानीने पाचगणीच्या मुख्याधिकार्‍यांना लेखी पत्र लिहून पाचगणीतील कोणत्याही नगरसेवकाला कसलीही माहिती देऊ नये, असा लेखी आदेशच दिला असल्याचा आरोप करून कासुर्डे म्हणाले, नगराध्यक्षांनी लेटरहेडवरील पालिकेचा लोगो आणि पालिकेचा शिक्का वापरून अरुण किसन भिलारे यांना बिअर शॉप हा व्यवसाय करण्यास ना हरकत दाखला दिला आहे. नगरपालिकेच्या मालकीची इमारत असल्याने त्यांना असा दाखला देण्याचा कसलाही अधिकार नाही. रोज लँड स्कूलला देखील नगराध्यक्षांनी अशीच जागा दिली असून त्यासाठी त्यांनी पालिकेचा कसलाही ठराव केला नाही. या मिळकतीचा वाद उच्चस्तरीय समितीकडे असताना देखील नगराध्यक्षानी मनमानीने ही जागा देऊन पालिकेच्या हिता विरोधी भूमिका घेतली आहे. रमेश शंकर खरात यांना साईप्रसाद ऑन लाइन लॉटरी सेंटर या व्यवसायाकरता, श्रीमती कमल कोंडीबा कांबळे यांना घरबांधणीसाठी, निलेश प्रकाशसिंह ठाकूर यांना बंदुकीचे लायसन काढण्यासाठी, सुधीर सुभाष मालुसरे यांना चांगल्या वर्तुणुकीचा व रेशनिंग कार्ड काढण्यासाठी, सखरअली फेसुद्दीन चौधरी यांना आधारकार्ड काढण्यासाठी नगरपरिषदेची काहीही हरकत नाही, असा दाखला बेकायदेशीररीत्या दिला आहेे.
कासुर्डे पुढे म्हणाले, स्वीकृत नगरसेवकांची निवड देखील नगराध्यक्षांनी गेल्या अडीच वर्षात हेतुपरस्पर केली नाही. याबाबत मी जिल्हाधिकार्‍यांकडे दाद मागितली होती. यावर जिल्हाधिकार्‍यांनी देखील ही बाब अतिशय गंभीर स्वरुपाची असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर यांनी गैरवर्तणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर, हलगर्जीपणा करुन पालिका आणि नागरिकांचे नुकसान केले आहे. अशा नगराध्यक्षांना पदमुक्त करावे.
पत्रकार परिषदेत संजय कासुर्डे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पोहोच केलेले पत्र सादर केले. यावर विरोधी गटातील विजय कांबळे, नारायण बिरामणे, विनोद बिरामणे, रेखा कांबळे, रेखा जानकर, अनिल वन्ने, पृथ्वीराज कासुर्डे, नीता कासुर्डे, हेमा गोळे यांच्यासह सत्ताधारी गटातील विठ्ठल बगाडे, सुमन गोळे, आशा बगाडे, अर्पणा कासुर्डे या 13 नगरसेवकांच्या सह्या आहेत.
सत्ताधार्‍यांमुळे सौ. कर्‍हाडकरांच्या अडचणीत वाढ
पाचगणी पालिकेत सत्ताधारी गट आणि विरोधी गट यांचे 9-9 असे समसमान बलाबल आहे. विरोधी गटातील 9 नगरसेवक ठाम राहिल्याने सौ. कर्‍हाडकर यांना काटावरच्या बहुमतावर कास्टिंग व्होटचा वापर करून प्रत्येक ठराव आपल्या बाजूने वळवावा लागत आहे. 9 मधील पूर्वाश्रमीचे विरोधी गटातील नगरसेवक विठ्ठल बगाडे, सौ. सुमन गोळे, सौ. अर्पणा कासुर्डे आणि आशा बगाडे या चौघांच्या देखील अविश्‍वास ठरावाच्या बाजूने सह्या असल्याने सौ. कर्‍हाडकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मकरंद पाटील यांच्या मुत्सद्दीपणाचीच चर्चा
पाचगणी शहरात मकरंद पाटील यांना मागच्या दोन्ही निवडणुकीत अपेक्षित मतदान मिळालेले नाही. मकरंद पाटील यांच्या छत्र छायेखाली आलेल्या 13 नगरसेवकांमुळे त्यांची ताकद वाढली असून पाचगणीचे बाहुबली नेतृत्व समजल्या जाणार्‍या सौ. लक्ष्मी कर्‍हाडकर पहिल्यांदाच बॅक फुटवर आल्या आहेत. या अविश्‍वास ठरावाच्या निमित्ताने मकरंद पाटील यांच्या मुत्सद्दीपणाची चर्चा सर्वत्र आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: