Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सातारा शहरात दुचाकी चोरट्यांचे प्रस्थ वाढले
ऐक्य समूह
Wednesday, July 10, 2019 AT 10:58 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 9 : सध्या सातारा शहरात दुचाकी चोरट्यांचे चांगलेच प्रस्थ वाढले असून गेल्या आठवडाभरात शाहूपुरी तसेच सातारा शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीस गेल्याच्या चार ते पाच तक्रारी दाखल झाल्या आहेत. दररोज एकतरी दुचाकी चोरीची तक्रार दाखल होत असून दुचाकी चोरट्यांच्या कारवायामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
याबाबत माहिती अशी की, गत आठवड्यात चार ते पाच जणांनी शहर व परिसरातून दुचाकी चोरीस गेल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. दि. 8 रोजी देखील सातारा शहर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाली असून प्रणव समाधान घाडगे (वय 22), रा. मूळ कामेरी, ता. सातारा सध्या सुमनराज रेसिडेन्सी, गोडोली सातारा यांची प्रतिभा हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली होंडा सीडी डिलक्स क्रमांक (एम. एच. 11 बीयू 9710) ही 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली. याबाबत घाडगे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस नाईक दगडे याचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच दोन दुचाकी चोरट्यांना 10 गाड्यांसह पोलिसांनी जेरबंद केले आहे. मात्र, सातारा शहरातील दुचाकी चोरीचे सत्र काही थांबत नाही. हॉस्पिटल पार्किंग, लॅब पार्किंग तसेच घरासमोरून दुचाकी चोरण्यात येत असल्याने या चोरट्यांना लगाम घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. दुचाकी चोरीस गेल्यानंतर वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून हँडल लॉक केले असले तरी दुचाकी चोरीस जात असल्याने आता दुचाकीचे संरक्षण चोरट्यांपासून कसे करायचे हा प्रश्‍न वाहनधारकांना पडला आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: