Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संतांच्या पालख्या वाखरीत दाखल
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: mn4
औदुंबर भिसे
5वाखरी, दि. 10 :
विठ्ठल आमुचे जीवन।
आगम निगमाचें स्थान।
विठ्ठल सिद्धीचे साधन।
विठ्ठल ध्यान विसावा॥
विठ्ठल आमुचे जीवन आहे. आगम निगमाचे स्थान आहे, सिद्धीचे साधन आहे आणि तोच आमचा विसावा आहे. अशा सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून लाखो वैष्णवांसह टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करत भक्तीचे मळे फुलवित आषाढी वारीने पंढरीस निघालेल्या श्री. संत ज्ञानदेव, श्री. संत तुकाराम महाराज,  संत सोपानदेव आदी संतांसह राज्यभरातून आलेल्या संतांचे पालखी सोहळे पंढरी समीप वाखरीत दाखल झाले आहेत. आता पंढरपूर हाकेच्या अंतरावर राहिले आहे. दरम्यान, संत ज्ञानदेव व संत तुकोबाराय यांच्या पालखी सोहळ्यातील उभे व गोल रिंगण अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडले. उद्या, दि.10 रोजी हा भक्तीचा महासागर विठूरायाच्या भूवैकुंठ नगरीत पोहोचेल व चंद्रभागेत विलीन होईल. भंडीशेगाव मुक्कामी पहाटे माउलींची विधिवत पूजा करण्यात आली. दिवसभर माउलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. कांदेनवमीच्या निमित्ताने पालखी तळावर वारकर्‍यांनी दिंड्या- दिंड्यामध्ये कांदाभजी करून कांदेनवमी साजरी केली. दुपारचे भोजन घेवून हा सोहळा शेवटच्या वाखरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. दुपारी 3 वाजता हा सोहळा बाजीराव विहीर येथे उभ्या
रिंगणासाठी पोहोचला. दुपारी 3.15 वाजता अश्‍व धावण्यासाठी सोडण्यात आले. ढगांमध्ये मेघराजाने गर्दी केली आणि अश्‍वांसह मेघराजाही बरसू लागला. पुढे स्वाराचा अश्‍व तर मागे माउलीचा अश्‍व धावत होता. टाळ मृदुंगाच्या गजरात माउलीऽ माउलीऽऽ नामाचा अखंड जयघोष सुरू होता. अश्‍वांनी धावत जावून माउलींला एक प्रदक्षणा पूर्ण करत रथामागे 20 दिंड्यांपर्यंत गेला. त्यानंतर पुन्हा रथाजवळ येवून माउलींचे दर्शन घेतले. नारळ, प्रसाद घेवून पुन्हा तो पंढरीच्या दिशेने धावत आला. यावेळी पुंडलीक वरदे, हरी विठ्ठल असा जयघोष वैष्णवांनी केला व उभे रिंगण पूर्ण करण्यात आले. उभ्या रिंगणाचा सोहळा संपल्यानंतर गोल रिंगणासाठी हा सोहळा सायंकाळी 4 वाजता रस्त्यालगतच्या मैदानात पोहोचला. चोपदार व पोलिसांनी रिंगण आखून घेतले. या आखीव रेखीव रिंगणावर गोल रिंगणाला सुरुवात झाली. सुरुवातीला माउलींचा व स्वाराचा अश्‍व रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आला. त्यानंतर पताकाधारी व माउलींची पालखी दिंड्यांसमवेत एक प्रदक्षणा पूर्ण करून रिंगणाच्या मध्यभागी आणण्यात आली. 5 वाजता जरी पटक्याचा भोपळे दिंडीचा ध्वज रिंगणात धावण्यासाठी सोडण्यात आला. त्याने 3 प्रदक्षणा पूर्ण केल्या. त्यानंतर स्वाराच्या अश्‍वासह माउलींच्या अश्‍वाने लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत नेत्रदीपक दौड करून अडीच प्रदक्षणा पूर्ण केल्या. यावेळी उपस्थितीत भाविकांनी माउलीऽ माउलीऽऽ नामाचा जयघोष केला. गोल रिंगणानंतर दिंड्यादिंड्यामध्ये खेळ रंगले. उडीच्या खेळानंतर हा सोहळा वाखरीकडे मार्गस्थ झाला. समाज आरतीनंतर तो वाखरीत विसावला.
संत तुकोबांचे उभे रिंगण
माउलींचे गोल रिंगण सुरू असतानाच पालखी मार्गावर तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात उभे रिंगण पार पडले. टाळ, मृदुंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात अश्‍वांनी नेत्रदीपक दौड केली व हा रिंगण सोहळा संपवून तुकोबारायांचा पालखी सोहळा वाखरी मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. आज पालख्या पंढरीत, उद्या, दि.10 रोजी संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत चौरंगीनाथ, चांगा वटेश्‍वर, गुलाबबाबा, संत नाथ महाराज, गवार शेठ लिंगायत वाणी (तुकाराम महाराजांचे टाळकरी), संत गोरोबा काका, जगनाडे महाराज आदी संतांच्या पालख्यांना विठुरायाच्या नगरीत नेण्यासाठी संत नामदेव यांची पालखी वाखरीत येईल. त्यानंतर हे सोहळे पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होतील. सर्व संतांना पुढे करून सर्वात शेवटी दुपारी माउलींची पालखी वाखरीतून पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्थ होणार आहे. विसावा पादुका येथे पालखी सोहळ्यातील शेवटचे उभे रिंगण होणार आहे. त्यानंतर आरती होईल. माउलींच्या पादुका या शितोळे सरकारांच्या गळ्यात दिल्या जातील व त्या पंढरपुरातील ज्ञानेश्‍वर मंदिरात नेल्या जातील.
पंढरपूरमध्ये येणार्‍या मानाच्या पालख्यांचा क्रम
1) संत नामदेव 2) संत मुक्ताबाई 3) संत सोपानकाका 4) संत निवृत्तीनाथ 5) संत एकनाथ 6) संत तुकाराम 7) संत ज्ञानदेव.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: