Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अल कायदाच्या म्होरक्याची हल्ले करण्याची भारताला धमकी
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमान अल जवाहिरी याने एका व्हिडिओद्वारे भारताला धमकी दिली आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर सरकारवर न थांबता हल्ले करत राहिले पाहिजे, असे जवाहिरीने व्हिडिओत म्हटले आहे. फौंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमॉक्रेसिज लाँग वॉर जर्नलने हे वृत्त दिले आहे. 
जवाहिरी याने ‘अस शबाब’द्वारे जारी केलेल्या ‘डोंट फरगॉट काश्मीर’ नामक संदेशात दहशतवादातील पाकिस्तानच्या सहभागासंदर्भातही उल्लेख केला आहे.
अल कायदा ही दहशतवादी संघटना काश्मीरमध्ये भारतीय लष्कराविरोधात जिहाद छेडण्यासाठी दहशतवादी गटाची निर्मिती करण्याच्या प्रयत्नात आहे, असे थॉमस जॉस्ली यांनी जर्नलमधील आपल्या लेखात म्हटले आहे. मुजाहिद्दीनने काश्मीरमध्ये कमीतकमी भारतीय लष्कर आणि सरकारवर सतत हल्ले करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे, असे जवाहिरीने म्हटले आहे. असे केल्याने भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी होईल. शिवाय भारताचे मनुष्यबळ आणि साधनसामुग्रीचेही मोठे नुकसान होईल, असेही जवाहिरीने म्हटले आहे.
जवाहिरी बोलत असताना व्हिडिओमध्ये झाकिर मुसाचा फोटो दिसत आहे. मात्र, जवाहिरीने बोलताना मुसाचा उल्लेख केलेला नाही. भारतीय लष्कराने झाकिर मुसाचा मे महिन्यात खात्मा केला होता. मुसा हा अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या भारतातील गटाचा संस्थापक होता. पाकिस्तानी सैन्य आणि सरकार हे अमेरिकेचा लाळघोटेपणा करत असल्याची टीकाही जवाहिरीने पाकिस्तानवर केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: