Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्नाटक पाठोपाठ गोव्यात काँग्रेसला खिंडार
ऐक्य समूह
Thursday, July 11, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na2
15 पैकी 10 आमदार भाजपच्या गोटात
5गोवा, दि. 10 (वृत्तसंस्था) : कर्नाटक पाठोपाठ आता गोव्यातही काँग्रेसला खिंडार पडले आहे. गोव्यातील काँगे्रसच्या 15 पैकी 10 आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपत प्रवेश केला आहे. आधीच कर्नाटकचा पेच सोडवताना काँग्रेस आणि जेडीएसची दमछाक सुरू असताना आता गोव्यातील या राजकीय भूकंपामुळे काँगे्रससमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे, की विरोधी पक्षनेत्यासह दहा आमदारांनी भाजपत प्रवेश केला आहे. या राजकीय भूकंपामुळे गोवा विधानसभेत भाजप आमदारांची संख्या आता 27 झाली आहे. हे सर्व आमदार आपल्या मतदारसंघाच्या विकासा-साठी भाजपत आले आहेत. त्यांनी कोणत्याही अटीशिवाय भाजपत प्रवेश केला आहे. 
दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अगोदर गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाबू केवलेकर यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष माइकल लोबो यांच्याशी संपर्क साधला होता. त्यामुळे असे मानले जात आहे की हा गट काँग्रेसमधून फुटून भाजपत जाणार आहे  तर या अगोदर जून महिन्यातच गोवा भाजप अध्यक्ष विजय तेंडुलकर यांनी देखील दावा केला होता, की काँग्रेसचे 10 आमदार भाजपत प्रवेश करू इच्छित आहेत. मात्र पक्षाने त्यांचा प्रस्ताव अद्याप स्वीकारलेला नाही, कारण भाजपकडे विधानसभेत पुरसे संख्याबळ आहे.
गोवा विधानसभेतील आमदारांची संख्या एकूण 40 आहे. त्यात आतापर्यंत भाजप- 17, काँग्रेस -15, जीपीएफ -3, एमजीपी -1 , एनसीपी -1 व अपक्ष-2 असे संख्याबळ होते. मात्र आता काँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपत प्रवेश केल्याने भाजप आमदारांची संख्या 27 झाली आहे. पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदी लागू होऊ नयेत म्हणून काँग्रेसचे दहा आमदार फुटले. पंधरापैकी दहा म्हणजे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नसल्याचे जाणकारांनी सांगितले.  दहा आमदारांच्या राजीनाम्यामुळे आता काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणो, लुईडिन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत व आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स  तेवढे राहिले आहेत. नव्या सरकारमध्ये बाबू कवळेकर हे उपमुख्यमंत्रिपदी असू शकतील. त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची ग्वाही भाजपने दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: