Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोरणे घाटात रस्ता खचला
ऐक्य समूह
Friday, July 12, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: re1
पन्नास गावांचा संपर्क तुटणार; नाले न काढण्याचा परिणाम
5सातारा, दि. 11 : सातारा - जांभे मार्गावर बोरणे घाटामध्ये रस्ता खचल्याची घटना आज सायंकाळी 6. 30 वाजण्याच्या सुमारास घडली. यावर्षी बांधकाम विभागाने घाटामध्ये नाले न काढल्याने ही घटना घडल्याचा आरोप परिसरातील गावातील नागरिकांनी केला असून रस्ता नसल्यामुळे साधारण 50 गावांचा संपर्क तुटणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे बोरणे घाटामध्ये मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर छोटे छोटे धबधबे पडत आहेत. यावर्षी बांधकाम विभागाने पडणार्‍या धबधब्याचे पाणी जाण्यासाठी नाले न काढल्यामुळे घाटातील दारे या ठिकाणापासून काही अंतरावर दरीकडील रस्त्याचा भाग आज सायंकाळी खचला. रस्ता खचत असताना घाटातून उताराने रस्त्यावरून येणारे पाणी अतिवेगाने रस्ता खचलेल्या ठिकाणावरून दरीत जाऊन पडू लागल्यामुळे घटनास्थळी भीषण चित्र दिसून येत होते. या घटनेची माहिती येथील प्रवीण चव्हाण यांनी सातारातालुका पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी तत्काळ याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली.
मिळालेल्या माहितीनुसार प्रतिवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने दरडीच्या बाजूला नाले काढण्यात येतात. हे काम गजवडी येथून घाट सुरू होताना सुरू केले.  
मात्र सज्जनगड येथे आल्यानंतर ते काम थांबवण्यात आले. परिणामी घाटातील डोंगरावर पडलेले पावसाचे पाणी धबधब्याच्या रूपाने रस्त्यावर पडू लागले. सतत हे पाणी पडत असल्यामुळे आज सायंकाळी 6.30 वाजण्याच्या दरम्यान या घाटातील रस्ता खचला. घाटातील संरक्षक भिंतही दरीमध्ये कोसळून पडली आहे. या घटनेमुळे सातारा येथून जांभेकडे जाणारे आणि जांभे येथून सातारकडे येणारे प्रवासी रस्त्यातच अडकून पडले. या घटनेची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते आंबेकर यांना मिळाल्यानंतर बांधकाम विभागाचे कर्मचारी व पोलीस कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सर्वप्रथम रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. सतत पाऊस आणि धुक्याचे वातावरण असल्यामुळे रात्रीचे वेळी घटनास्थळी कोणतेही काम हाती घेण्यात येणार नसल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली. मात्र मोठ्या प्रमाणावर रस्ता असल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केल्याने सातारा आणि पाटण तालुक्यातील साधारण 50 गावांचा संपर्क तुटणार आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच तुटलेला संपर्क पूर्ववत होईल.
राहुल शिंदे यांचे भाकीत खरे ठरले
गुरुवारी सातारा पंचायत समितीची मासिक बैठक झाली. त्यावेळी बांधकाम विभागाच्या आढावा दरम्यान सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. संभाव्य दरडी कोसळण्याची ठिकाणे, रस्ता करू शकतो अशा ठिकाणांची पाहणी केली आहे का? पाहणी केली असेल तर त्यावर काय उपाय योजना केल्या आहेत, अशी विचारणा सदस्य राहुल शिंदे यांनी केली होती. त्यावर बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी सारे काही आलबेल आहे, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावरही राहुल शिंदे यांनी उपाययोजना केल्या नसतील तर त्या तत्काळ करा. उद्या एखादी घटना घडून गेल्यानंतर डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यानंतर साडेतीन तासाच्या अवधीत बोरणे घाटातील रस्ता खचल्यामुळे राहुल शिंदे यांचे भाकीत खरे ठरल्याचे स्पष्ट होते.
ठोसेघर येथील व्यावसायिकांचे
लाखो रुपयांचे नुकसान होणार!
पावसाळी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर ठोसेघर धबधबा परिसरात काही नागरिकांनी हॉटेल सुरू केले आहे तर तर काहींनी वडापाव, भजी, मिसळ, चहा, भुर्जीपाव, मक्याची कणसे यांचे स्टॉल सुरू केले आहेत. या ठिकाणी दर शनिवारी आणि रविवारी नागरिकांचा हजारोंच्या घरात व्यवसाय होतो. या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास येथील व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: