Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

यंदा क्रिकेटला मिळणार नवा विश्‍वविजेता
ऐक्य समूह
Friday, July 12, 2019 AT 11:28 AM (IST)
Tags: sp1
यजमान इंग्लंडकडून ऑस्ट्रेलिया पराभूत
5लंडन, दि. 11 (वृत्तसंस्था) : बर्मिंगहॅमच्या मैदानावर झालेल्या  दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात यजमान इंग्लंडने पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवली. इंग्लंडने ऑस्ट्रेलियावर आठ गडी राखून दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. आता अंतिम फेरीत इंग्लंडला रविवारी न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडपुढे सर्वबाद 224 धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडच्या जेसन रॉय आणि जॉनी बेअसस्टोव यांनी 124 धावांची दमदार सलामी देत इंग्लंडला विजयाच्या समीप पोहोचविले. बेअसस्टोव 34 धावांवर बाद झाला. जेसन आक्रमक खेळ करत असतानाच सदोष पंचगिरीचा फटका त्याला बसला. त्यामुळे त्याचे शतक हुकले. सीन रॉय याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची पिसे काढली. त्याने स्टीव्हन स्मिथला तीन षटकार लगावले. परंतु त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. जेसनने 65 चेंडूंत 9 चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर 85 धावांची खेळी साकारली. जेसन बाद झाल्यावर जो रुट आणि इऑन मॉर्गन यांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी, स्टीव्हन स्मिथच्या 85 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला 223 धावा करता आल्या. स्मिथला यावेळी यष्टीरक्षक कॅरीची चांगली साथ मिळाली. कॅरीने जबड्याला दुखापत होऊनही 46 धावांची खेळी साकारली.
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अ‍ॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि नव्यानं ताफ्यात दाखल झालेला पिटर हँड्सकोम्ब यांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अपयश आले. ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी ऑसींना धक्के देत त्यांची अवस्था 3 बाद 14 अशी केली. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि अ‍ॅलेक्स केरी यांनी खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला. डावाच्या आठव्या षटकात ऑसींना आणखी एक मोठा धक्का बसता बसता राहिला. आर्चरने टाकलेल्या आठव्या षटकातील उसळी घेणारा चेंडू केरीच्या जबड्यावर आदळला आणि त्याला दुखापत झाली. चेंडूचा वेग इतका होता, की केरीच्या जबड्यावरील कातडी सोलली गेली अन् रक्त वाहू लागलं. केरीच्या जबड्यातून वाहणारं रक्त पाहून ऑसींच्या गोटात चिंता पसरली होती. केरीला तातडीनं वैद्यकीय मदत करण्यात आली. जबड्यावर पट्टी लावून त्यानंतर केरी मैदानावर खेळत राहिला.
पंचाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका
इंग्लंडने एक रिव्ह्यू गमावल्यामुळे त्यांच्याकडे दुसरी संधी नव्हती. जेव्हा जेसनचा झेल पकडला गेला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी जोरदार अपील केले. त्यानंतर पंच कुमार धर्मसेना यांनी त्याला बाद ठरविले. पण जेसन खेळपट्टीवरून हलायला तयार नव्हता. पण अखेर त्याला माघारी परतावे लागले. तो माघारी परतत असताना मैदानात हा चेंडू पुन्हा एकदा दाखवण्यात आला. त्यावेळी चेंडू बॅटला लागला नसल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतरही निराश जेसनला माघारी परतावे लागले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: