Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिवसेना पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आक्रमक
ऐक्य समूह
Friday, July 12, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) :  शेतकर्‍यांसाठी शिवसेना बुधवार, दि. 17 रोजी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात मोर्चा काढणार आहे. वांद्रे येथील संकुलात एका कंपनी विरोधात हा प्रतिकात्मक मोर्चा काढला जाणार आहे. शेतकर्‍यांना नाडणार्‍यांना धडा शिकवल्याशिवाय शिवसेना गप्प बसणार नाही, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
सगळ्या कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची नावे बँकांनी लावली पाहिजेच, अशी मागणी केली आहे. काही ठिकाणी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले, मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी ही मागणी आम्ही केली आहे. सरकारच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. झारीतले शुक्राचार्य कुणी असतील तर त्यांचा बंदोबस्त केला जाईल. शेतकर्‍यांना जर कुणी नाडले तर आम्ही त्यांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
बुधवारचा मोर्चा हा एका कंपनीवर प्रतीक म्हणून जाईल. इतर कंपन्यांवर आमची शिष्टमंडळे जातील. शिवसेना कायम शेतकर्‍यांसोबत आहे. शेतकर्‍यांबाबतचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.    
विमा कंपन्यांना सरकारी भाषा समजत नसेल तर शिवसेना आपल्या भाषेत त्यांना समाजावून सांगेल, असा इशारा त्यांनी सगळ्या विमा कंपन्यांना दिला आहे.
कर्जबाजारी शेतकर्‍यांची नावे बँकेच्या दारावर लावता त्याचप्रमाणे कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची नावेही बँकांच्या दारांवर लावण्यात यावी, ही आमची मागणी आहे. 17 जुलै रोजी पीक विमा कंपन्यांविरोधात आम्ही मोर्चा काढतो आहोत. हा इशारा मोर्चा असणार आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पीक विम्यासाठी मोर्चा शिवसेनेचा ‘स्टंट’ : अशोक चव्हाण
सरकार म्हणून कर्तव्य बजावण्यात शिवसेना साफ अपयशी ठरली आहे. सरकार म्हणून ते शेतकर्‍यांना न्याय मिळवून देऊ शकलेले नाहीत. हे अपयश झाकण्यासाठीच आता ते विमा कंपन्यांवर मोर्चे काढण्याचा ‘स्टंट’ करत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
येत्या 17 तारखेला मुंबईतील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चे काढण्याबाबत शिवसेनेच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. शेतकर्‍यांना पीकविम्याचा फायदा न मिळण्यासाठी या योजनेचे जाचक नियम व अटी कारणीभूत आहेत. हे निकष शिथील करण्यासाठी शिवसेनेने मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेऊन शेतकर्‍यांना दिलासा मिळवून द्यायला हवा होता. मात्र ते करण्याऐवजी राजकीय मोर्चे काढून केवळ शेतकर्‍यांची सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप शिवसेना करत असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
पीक विम्याचा प्रश्‍न गंभीर आहे. या योजनेत शेतकर्‍यांवर अन्याय होतो आहे, हे देखील वास्तव आहे. पण शेतकर्‍यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी सरकारमधील पक्षांनी या संदर्भात शासकीय पातळीवर धोरणात्मक निर्णय घेऊन कंपन्यांना भरपाई देण्यासाठी बाध्य केले पाहिजे. केवळ मोर्चा काढून काहीही होणार नाही असे म्हटले.
जुलै महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी अजूनही राज्यभरात पीककर्जाचे समाधानकारक वितरण झालेले नाही. काल-परवापर्यंत राज्यात जेमतेम 25 टक्के कर्जाचे वाटप झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. आजमितीस शेतकर्‍यांना पावसाची आणि पेरणीसाठी पतपुरवठ्याची गरज आहे. अशा ज्वलंत समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी सवंग प्रसिद्धीसाठी राजकीय मोर्चे काढणार्‍या सत्ताधारी पक्षांचा खरा चेहरा यानिमित्ताने शेतकर्‍यांसमोर आल्याचे म्हणत, अशोक चव्हाण यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: