Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विदर्भ, मराठवाड्याकडे पावसाची पाठ जुलै अखेरीस कृत्रिम पावसाचा प्रयोग
ऐक्य समूह
Friday, July 12, 2019 AT 11:22 AM (IST)
Tags: mn4
5मुुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : मुंबईसह कोकण व उत्तर महाराष्ट्रात पावसाने तुफान हजेरी लावली असली तरी विदर्भ आणि मराठवाड्यावर मात्र अजूनही वरुणराजाची कृपा झालेली नाही. 11 जुलैपर्यंत राज्यात 85.31 टक्के एवढा पाऊस झाला असला तरी आधीच दुष्काळामुळे अडचणीत असलेल्या विदर्भ, मराठवाड्यात मात्र सरासरीच्या 50 टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी सुरू केली आहे. जुलै अखेरीस हा प्रयत्न होणार आहे.
जून महिन्यात राज्यातील पर्जन्यवृष्टीचा आढावा घेतल्यानंतर राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत निर्णय घेतला जातो. परंतु, राज्यावरचे दुष्काळाचे सावट लक्षात घेऊन राज्य मंत्रिमंडळाने यापूर्वीच कृत्रिम पावसाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. त्यासाठी 30 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मान्यताही देण्यात आली आहे.  
जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैपासून पावसाने संततधार धरली आहे. मुंबईसह कोकणात व नाशिकमध्ये नद्या व धरणे दुथडी भरून वाहू लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र, विदर्भातील 6 जिल्हे व मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये पावसाने अद्याप जोर धरलेला नाही. त्यामुळे शेतकरी व स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी तेथील परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. या भागासह अन्य काही भागातील अपुरे पर्जन्यमान लक्षात घेता राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी पुढे सुरू ठेवली आहे. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात बंगळुरूच्या ख्याती या कंपनीची निवड झाली आहे.
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमानाची आवश्यकता असते. हे विमान, वैमानिक, रडार व उपकरणे परदेशातून येतात. त्यामुळे विमान उड्डाण करण्यापूर्वी नागरी हवाई उड्डाण विभागाची तसेच उपकरणे परदेशातून आणण्यापूर्वी कस्टम विभागाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे या परवानग्या मिळवण्यासाठी संबंधित खात्यांकडे अर्ज करण्यात आले आहेत. या सर्व परवानग्या मिळाल्यावर जुलै अखेरीपर्यंत कृत्रिम पाऊस पाडणारे विमान व यंत्रणा महाराष्ट्रात येईल. त्यानंतरही पुरेसा पाऊस न झाल्यास कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी विमान हवेत झेपावू शकेल, अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागातील सूत्रांनी दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: