Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ग्रेडसेपरेटर पूर्ण होईपर्यंत राजपथावर दुहेरी वाहतूक
ऐक्य समूह
Friday, July 12, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: lo1
जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या बैठकीत निर्णय; अतिक्रमणे काढण्याच्या पालिका व बांधकामला सूचना
5सातारा, दि. 11 : एकेरी वाहतूकसुरू केल्यानंतर त्याबाबत आलेल्या सूचनांबाबत विचार करण्यासाठी गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेयांच्या दालनात झालेल्या बैठकीत ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत राजपथावर दुहेरी वाहतूक सुरू ठेवण्याच्या निर्णयाबरोबरच खालच्या रस्त्यावर एकेरी वाहतूक कायम ठेवण्यात आली तर सातारा पालिका व बांधकाम विभागाने त्यांच्या अखत्यारितील रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने काढण्याच्या सूचना सातपुते यांनी दिल्या. शहरात हॉकर्स झोन मार्क करावेत तसेच पार्किंगसाठी जागा तयार करण्याच्या सूचनाही पालिकेला करण्यात आली.
एकेरी वाहतुकीसंदर्भात आयोजित या बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे, बांधकाम विभागाचे शहर अभियंता राहुल अहिरे, दुय्यम अभियंता सुधीर चव्हाण, अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांची उपस्थिती होती.
या बैठकीत 6 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये पोवई नाक्यावरील ग्रेडसेपरेटरचे काम पूर्ण होईपर्यंत साधारण सहा महिने राजपथावरचा रस्ता हा दुहेरी वाहतुकीसाठी वापरण्यात येईल. कर्मवीर पथ म्हणजे मोती चौक   ते आर. के. बॅटरी खालचा रस्ता एकेरीच वाहतूक राहणार असून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मोती चौकाकडे आर. के. बॅटरीपासून प्रवेश बंद राहणार आहे.
हॉकर्स झोन व पार्किंग जागा तयार करा
रस्त्यावरील विक्रेत्यांमुळे वाहतुकीस होणारी अडचण लक्षात घेता सातारा पालिकेने तातडीने हॉकर्स झोन मार्क करून तयार करून घ्यावेत तसेच पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ठरावीक जागा तयार करून तशा प्रकारचे फलक लावून पार्किंग सुविधा निर्माण करावी. दुकानदारांनी ग्राहकांना येण्याजाण्यापुरते पट्टे आखून पालिकेने त्यांना रॅम्प बनवून द्यावेत तसेच वाहतूक शाखेने दुकानांसमोर ठेवण्यात येणा़र्‍या लोखंडी जाळया तसेच फलकांवर कारवाई करावी, अशी सक्त सूचना तेजस्वी सातपुते यांनी केली.
अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करा
बांधकाम विभाग व सातारा पालिकेने कर्मवीर पथ, राजपथ तसेच शहरातील इतर ठिकाणची अतिक्रमणे काढून घ्यावीत तसेच विशेष करून पोवई नाका, मोती चौक, गोलबाग व प्रत्येक रस्त्याच्या कोपर्‍यावरील अतिक्रमणे काढून तिथे पार्किंग व्यवस्था व हॉकर्स झोन निर्माण करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आली. पोवई नाका ते भू विकास बँक रस्त्याच्या दुहेरी बाजूकडील व फूटपाथावरील अतिक्रमणे त्वरित काढण्याबरोबरच अतिक्रमण पथकाने 15 दिवस एकसंधपणे ही मोहीम राबवावी. वर्दळीच्या जागेत चौका चौकात प्लॉस्टिक, फ्लेग्जिबल बोर्डस बसवावेत.
शहरातील रस्त्यांची अवस्था सुधरा
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत बैठकीत चर्चा झाली. यावेळी तेजस्वी सातपुते यांनी पालिकेने तातडीने यावर कार्यवाही करून पावसाऴ्यात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड़्यात मुरूम टाकून खड्डे भरून घेण्याच्या सूचना दिल्या. वाहतूक सुरळीत रहावी यासाठी या उपाय योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी तसेच नागरिक, वाहनधारकांनी देखील स्वयंशिस्त पाळून प्रशासनास सहकार्य करण्याची गरज सातपुते यांनी बैठकीत व्यक्त केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: