Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आयसीसीच्या विश्‍वचषक संघात विराट कोहलीला स्थान नाही
ऐक्य समूह
Tuesday, July 16, 2019 AT 11:21 AM (IST)
Tags: sp1
5लंडन, दि. 15 (वृत्तसंस्था) : क्रिकेट विश्‍वचषक समाप्त झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसीने ‘टीम ऑफ द टुर्नामेंट’ जाहीर केली आहे. या संघामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला स्थान मिळू शकलेले नाही. विराट कोहली आजच्या तारखेला जगातला सर्वोत्तम फलंदाज असूनही त्याला आयसीसीच्या संघात स्थान देण्यात आलेले नाही. सोमवारी आयसीसीने आपला संघ जाहीरकेला. भारताकडून सलग पाच शतके झळकवण्याचा विक्रम करणारा रोहित शर्मा, जसप्रीत बुमराहला आयसीसीच्या संघात स्थान मिळाले आहे.
स्पर्धेत विराट इतक्याच 443 धावा करणारा इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला स्थान देण्यात आले आहे. रॉयने सात सामन्यात 63.29 च्या सरासरीने धावा केल्या तर विराटने नऊ सामन्यात 55.38 च्या सरासरीने 443 धावा केल्या. मँचेस्टरमध्ये न्यूझीलंडकडून 18 धावांनी पराभूत झाल्यानंतर भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मालिकावीरचा पुरस्कार मिळवणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला आयसीसीच्या संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. माजी समालोचक इयन बिशप, इयन स्मिथ, इसा गुहा, क्रिकेटवर लिहिणारे लॉरेन्स बूथ यांनी आयसीसीचा संघ निवडला आहे.
रोहित शर्मा आणि जेसन रॉयला सलामीसाठी निवडण्यात आले आहे. रोहितने या विश्‍वचषक स्पर्धेमध्ये पाच शतकांसह सर्वाधिक 648 धावा केल्या. तिसर्‍या जागेसाठी विल्यमसन, त्यानंतर जो रुट, अष्टपैलू शाकीब अल हसन आणि बेन स्टोक्सची निवड करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक्स कॅरीला यष्टीरक्षणासाठी निवडण्यात आले आहे. मिचेल स्टार्क, जोफ्रा आर्चर, लॉकी फर्ग्युसन आणि जसप्रीत बुमराह यांना गोलंदाजीसाठी निवडण्यात आले आहे. मिचेल स्टार्कने सर्वाधिक 27 गडी बाद केले आहेत. इंग्लंडसाठी सुपर ओव्हर टाकणार्‍या जोफ्रा आर्चरने 20 गडी तर भारताच्या जसप्रीत बुमराहने 18 गडी बाद केले आहेत. आयसीसीच्या या संघात इंग्लंडच्या चार, भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या प्रत्येकी दोन तर बांगलादेशच्या एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: