Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

टीम इंडियाची धुरा विराट कोहलीकडेच!
ऐक्य समूह
Monday, July 22, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: sp1
5मुंबई, दि. 21 (प्रतिनिधी) : वेस्ट इंडीज दौर्‍यातील टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची आज (रविवार) निवड करण्यात आली. तीनही मालिकांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे आज निवड समितीची बैठक पार पडली. कर्णधार विराट कोहली हा देखील या बैठकीला उपस्थित होता. बैठकीनंतर दुपारी 2 च्या सुमारास पत्रकार परिषदेत नव्या संघाची घोषणा करण्यात आली. या दौर्‍यासाठी श्रेयस अय्यर, कृणाल पांड्या, राहुल चहर, दीपक चहर, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, खलिल अहमद यांच्यासारख्या अनेक तरुण खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. माजी कर्णधार एम. एस. धोनी या दौर्‍यावर जाणार नसल्याचे त्याने यापूर्वीच निवड समितीला कळविले असल्यामुळे त्याच्याऐवजी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय व टी-20 संघातून विश्रांती देण्यात आली आहे. केवळ कसोटी संघात बुमराहला स्थान देण्यात आले आहे. एकदिवसीय सामन्यात सातत्याने चांगली कामगिरी करणार्‍या शिखर धवनला कसोटी संघात संधी मिळालेली नाही. त्याच्याऐवजी हनुमा विहारीला संधी देण्यात आली आहे. आर. अश्‍विन आणि रवींद्र जाडेजा यांना कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. या दौर्‍यात टीम इंडिया तीन टी-20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.
एकदिवसीय मालिकेसाठी संघ-
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (क्षेत्ररक्षक), रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्‍वर कुमार, खलील अहमद व नवदीप सैनी
टी-20 मालिकेसाठी संघ -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (क्षेत्ररक्षक), रवींद्र जाडेजा, कृणाल पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्‍वर कुमार, खलिल अहमद, दीपक चहर व नवदीप सैनी.     
 कसोटी मालिकेसाठी संघ -
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के. एल. राहुल, चेतेश्‍वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (क्षेत्ररक्षक), ऋद्धिमान साहा (क्षेत्ररक्षक), आर. अश्‍विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह व उमेश यादव
भारत वि. वेस्टइंडीज यांच्यातील मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी-20 सामना : 3 ऑगस्ट, रात्री 8, फ्लोरिडा.
दुसरा टी-20 सामना : 4 ऑगस्ट, रात्री 8, फ्लोरिडा.
तिसरा टी-20 सामना : 6 ऑगस्ट, रात्री 8, गुयाना.
पहिला एकदिवसीय : 8 ऑगस्ट, सायंकाळी 7, गुयाना.
दुसरा एकदिवसीय : 11 ऑगस्ट, सायंकाळी 7, त्रिनिदाद.
तिसरा एकदिवसीय : 14 ऑगस्ट, सायंकाळी 7, त्रिनिदाद.
पहिली कसोटी : 22-26 ऑगस्ट, सायंकाळी 7, एंटिगुआ.
दुसरी कसोटी : 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, रात्री 8:00, जमैका.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: