Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुसळधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत
ऐक्य समूह
Friday, August 02, 2019 AT 11:19 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 1 : जिल्ह्याच्या काही भागात आज दिवसभर पावसाची धो धो सुरूच राहिल्यामुळे जनजीवन पूर्णपणे ठप्प झाले आहे. संगम माहुली, ता. सातारा येथील कृष्णा नदी पात्राच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असल्याचे आज दिसून आले. काशिविश्‍वेश्‍वर मंदिराच्या पायर्‍यांवर पाणी आल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सातारा- लोणंद मार्गावरील वाठार स्टेशन, ता. कोरेगाव नजीक रेल्वे वरील पूल खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह कोरेगाव, खंडाळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाटण, महाबळेश्‍वर, जावली व वाई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत. कृष्णा, वेण्णा, कोयना नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावांना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून पाणी सोडल्याने कराड शहराला पुराचा धोका निर्माण झाला आहे.    
सातारा जिल्ह्यात माण, खटाव तालुके वगळता जवळपास सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असून त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम होत आहे. सातारा शहराला आज सकाळपासून पावसाने झोडपून काढल्यामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचून राहिले आहे. शहर परिसरात काही ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सातारा-लोणंद मार्गावर वाठार स्टेशन, ता. कोरेगाव नजीक रेल्वेवरील पूल खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून सातारा येथून येणार्‍या वाहनांना पिंपोडे, तडवळे मार्गे लोणंदला जाता येईल, त्याच मार्गावरून लोणंदवरून सातार्‍याकडे वाहने वळविण्यात आली आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: