Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महागाव येथील महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू
ऐक्य समूह
Saturday, August 03, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 2 : महागाव, ता. सातारा येथील स्वाइन फ्लू झालेल्या एका महिलेचा आज पुणे येथे उपचार सुरू असताना सकाळी 10. 30 वाजता मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
याबाबत चिंचणेर वंदन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की शशिकला रघुनाथ कदम (वय 44), रा. महागाव, ता. सातारा यांना चार दिवसापूर्वी सर्दी, ताप, खोकला येत होता. त्यांनी गावातीलच एका खाजगी डॉक्टरकडे तपासणी करून औषधे घेतली. मात्र काहीच फरक न पडल्याने त्यांनी संगमनगर, (सातारा) येथील एका डॉक्टरला दाखवले. संबंधित डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता शशिकला कदम यांना स्वाईन फ्लूची लक्षण असल्याचे त्यांच्या लक्षात आले.   
त्यांनी तत्काळ चांगल्या रुग्णालयात तपासणी करून, औषध उपचार करून घेण्याची सूचना केली. त्यानुसार कदम कुटुंबीयांनी पुणे येथील कमांड हॉस्पिटलमध्ये शशिकला कदम यांना गुरुवारी दुपारी 12 वाजता दाखल केले. मात्र आज सकाळी 10.30 वाजता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. शशिकला कदम यांचा स्वाइन फ्लूनेच मृत्यू झाल्याचे चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस यांनी स्पष्ट केले. याबाबतची माहिती आरोग्य विभागाला मिळताच आशा गटप्रवर्तक सौ. सुषमा नीलेश चव्हाण, आशा स्वयंसेविका सौ. सविता वैभव आडके, सौ. माया मंगेश देवकर, आरोग्य सहाय्यक काशीद, आरोग्य सेवक फडतरे यांनी तत्काळ महागाव येथे धाव घेऊन, घरोघरी जाऊन सर्दी, ताप, खोकला असणारे रुग्ण कोणी आहेत का याबाबत सर्वे केला. हे सर्वेक्षण उद्या शनिवारी सुरू राहणार असून संशयित रुग्ण आढळल्यास त्याला तत्काळ येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
श्रीकांत कारखानीस आज भेट देणार
चिंचणेर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्रीकांत कारखानीस शनिवारी महागाव येथे भेट देणार आहेत. त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता शशिकला कदम यांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना औषधे उपलब्ध करून दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. स्वाइन फ्लूची साथ असल्यास विशेषत: गरोदर मातांची जास्त काळजी घ्यावी लागते, त्याअनुषंगाने उद्या शनिवारी आमचे पथक महागाव येथे घरोघरी जाऊन गरोदर माता असतील तर त्यांची तपासणी करणार आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: