Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कास-बामणोली रस्ता अतिवृष्टीमुळे बंद
ऐक्य समूह
Wednesday, August 07, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 6 : संततधार कोसळणार्‍या पावसामुळे सातारा शहरातला पाणी पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरुन जाणारे पाणी कासच्या पुलावरुन जात असल्यामुळे कास गावासह बामणोली भागातील 38 गावांचा सातारा शहराशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला असून बस सेवाही दोन दिवसांपासून ठप्प आहे.
कास धरणाची उंची वाढविण्याचे काम सुरु असून कास गावाकडून मातीचे काम पूर्ण झाले असून दगडांचे पिचिंग देखील पूर्ण झाले आहे. मात्र मुसळधार पावसामुळे सांडव्यालगतचे पाणी मातीच्या भराव्याच्या दिशेने गेल्याने पिचिंग केलेली माती कोसळत असून दगड व माती वाहून पुलाजवळ आल्याने पूल आतील बाजूने मुजला असल्याने पाणी पुलावरुन जात आहे. पाण्याचा प्रवाह एवढा जोरात आहे, की माणूस चालत देखील जाऊ शकत नाही. त्यामुळे कास, धावली, जुंगटी, जळकेवाडी, अंधारी, चोरगे उंबरी, जाधव उंबरी, फळणी, मुनावळे, कारगाव, कात्रेवाडी, पिसाडी, कळकोशी, आंबवडे, वाघळी, शेंबडी, पावशेवाडी, बामणोली, म्हावशी, बामणोली आश्रमशाळा, सावरी, शिवाजीवाडी तेटली, तेटली केळघर तर्फ सोळशी, आपटी शिवाजीवाडी, आपटी, हातरेवाडी, निपाणी, फुरुस, वाकी, रामेघर, वारसोळी, गोगवे या गावांचा सातारा शहराशी पूर्णपणे संपर्क तुटला आहे. सतर्कतेचा उपाय म्हणून साताराच्या प्रांत स्वाती देशमुख-पाटील, जावली तहसीलदार रोहिणी आखाडे यांनी कास तलाव व कास बामणोली रस्त्याची पाहणी केली असून सुरक्षिततेसाठी कास बामणोली रस्त्यावरुन कास पठार व कास तलावापासून पुढील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे. यामुळे कास गावाचाही संपर्क तुटला आहे. यावेळी लघुपाटबंधारे खात्याचे सहाय्यक अभियंता जयवंत बर्गे, शाखा अभियंता आरिफ मोमीन, बामणोली मंडलाधिकारी नेटके उपस्थित होते.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: