Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात
ऐक्य समूह
Thursday, August 08, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: lo2
घाटातून प्रवास न करण्याच्या सूचना; पारंबे फाटा येथे रस्ता खचला
5सातारा, दि. 7 : सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असून पूरस्थिती नियंत्रणात आली आहे. पाटण तालुक्यातील कोयना नदी पूररेषेच्या खालून वाहत आहे. नागरिकांनी शक्यतो घाटातून प्रवास करू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केल्या आहेत. दरम्यान सातारा-कास मार्गावर पारंबे फाटा येथे आज सकाळी रस्ता खचल्यामुळे कासकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. मंगळवारी कोयना धरणातून 1 लाख 24 हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात आले. आज त्याचे प्रमाण 1 लाख 106 क्युसेक्स असे आहे. कराड शहरात पाण्याच्या पुरामुळे साचून राहिलेले पाणी प्रवाहित झाले असून पुराच्या पाण्यामुळे स्थलांतरित केलेल्या कुटुंबीयांना आहार देण्याबरोबरच त्यांच्या आरोग्याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
आतापर्यंत सातारा जिल्ह्यातून 66 हजार जणांना पुराच्या पाण्यामुळे विस्थापित करण्यात आले आहे. पाटण आणि कराड तालुक्यात एनडीएची टीम कार्यरत असून त्यांचे पूर स्थितीवर लक्ष आहे. जिल्ह्यातील पूर स्थिती पूर्णपणे नियंत्रित आल्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये. कोणत्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पूर परिस्थितीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले 12 पूल लवकरच खुले करण्यात येतील. त्यामुळे जनजीवन सुरळीत होण्यास
मदत होईल.  
अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाई करणार
कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच. तब्बल 35 वर्षांनी कोयना धरणाचे इमर्जन्सी दरवाजे आज रात्री 9 वाजता उघडणार. हायअलर्ट जारी, अशा प्रकारच्या अफवा पसरवणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिला. कोयना धरणाला अशा प्रकारचा कोणताही इमर्जन्सी दरवाजा नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: