Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराडमध्ये पूर परिस्थिती कायम
ऐक्य समूह
Thursday, August 08, 2019 AT 10:57 AM (IST)
Tags: re1
कराड तालुक्यात 30 गावे बाधित; साडे चार हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविले
5कराड, दि. 7 : मंगळवारी सायंकाळनंतर पावसाचा जोर थोडासा कमी झाल्यामुळे कृष्णा नदीला आलेल्या पुराचे पाणी दोन ते चार फुटाने कमी झाली होता. मात्र, बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने व कोयनेतून 1 लाख 22 हजार क्युसेक्स पाणी तसेच धोम, कण्हेर, उरमोडी व तारळी धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे कराड परिसरात पुराचा धोका कायम आहे. कराड  तालुक्यातील 30 गावे पूरबाधित असून शहर व तालुक्यातील 1052 कुटुंबातील 4633 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. कराड नगरपालिका शाळा, जिल्हा परिषद शाळा व विद्यालये या ठिकाणी त्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे.
कराड तालुक्यात कृष्णा आणि कोयना नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. कराड-विटा मार्गावरील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला नवीन पूल बुधवारी सकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कृष्णा नदीची पाणीपातळी मंगळवारी सायंकाळी साठ फूट होती ती बुधवारी सकाळी दहा वाजता 4 फुटाने कमी झाली. तसेच कोयना नदीची पाणीपातळीही कमी झाली आहे. मंगळवार सायंकाळपासून बुधवारी सकाळी अकरापर्यंत कोयना धरणातून कोयना नदीत प्रति सेकंद 1 लाख 22 हजार क्युसेक्स  पाण्याचा विसर्ग सुरू होता. त्यामुळेच कृष्णा आणि कोयना नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली. मात्र असे असले तरी पाऊस उघडत नाही, तोपर्यंत पाटण, कराड तालुक्याला पुराचा धोका कायम आहे. कोयना धरणात सध्या एक लाखाहून अधिक क्युसेक्स पाणी येत आहे. त्यातच धरणात 102 टीएमसीहून अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सध्या 1 लाख 6 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बुधवारी विसर्ग कमी झाला असल्याने कोयना नदीपात्रातील पाणी पातळी कमी होत आहे. मात्र कराड परिसरातील रेठरे, वाठार, कार्वे अशा गावांना पुराचा फटका बसला आहे. अनेक कुटुबांना प्रशासना-कडून स्थलांतरित करण्यात आले आहे. मंगळवारी रात्रीच एनडीआरएफची टीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. आवश्यकता भासेल त्या ठिकाणी या टीममधील सदस्य पाठविले जात आहेत.  कराड तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही पूर परिस्थिती गंभीर असून त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन, पोलीस प्रशासन, एनडीआरएफचे जवान, स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे.  कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठचे बहुतांशी पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीषण परिस्थिती आहे. नदीकाठच्या पेरले, कोपर्डे, टेंभू, कोरेगाव, कार्वे, वडगाव, कोडोली, शेरे, दुशेरे, गोंदी, खुबी, रेठरे बुद्रुक,      रेठरे खुर्द, मालखेड, वाठारसह भागातील दक्षिण मांड नदीला कृष्णा नदीचा फुगवठा लागल्याने कालवडे, बेलवडे, काले गावांनाही पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे येथील शेती पाण्याखाली गेली आहे.
कराड शहरातील भैरवनाथ मंदिर, पाटण कॉलनी, साई मंदिर परिसर, लल्लुभाई चाळ, जोशी बोळ, रुक्मिणीनगर, कोयना दूध कॉलनी, रुक्मिणीनगर झोपडपट्टी येथील 195 कुटुंबातील 752 लोकांना नगरपालिका शाळांमध्ये हलविण्यात आले आहे. कराड नगरपालिका व सामाजिक संस्थांच्यावतीने त्यांना दोन वेळचे जेवण, नाष्टा व औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे. कराड शहरातील मुस्लीम समाज जमितुल उलम हिंद, मोमीन मस्जिद तसेच नगरसेवक फारुख पटवेकर, मौलाना फारुख, बरकत पटवेकर यांच्यावतीने बाधित 250 लोकांसाठी जेवणाची सोय  करण्यात आली होती. पुराचा वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तांबवे येथील 184 कुटुंबातील 741 लोकांना, गोटे येथील 25 कुटुंबातील 128, पाल येथील 2 कुटुंबातील 17, उंब्रज येथील 25 कुटुंबातील 117, पोतले येथील 2 कुटुंबातील 6, खुबी येथील 2 कुटुंबातील 6, कापील 3 कुटुंबातील 19, पाचवड वस्ती मळा येथील 8 कुटुंबातील 45, कोर्टी येथील 3 कुटुंबातील 12, शेरे येथील 12, रेठरे बुद्रुक येथील 41 कुटुंबातील 162, येरवळे येथील 24 कुटुंबातील 99, सयापूर येथील 10 कुटुंबातील 38, कवठे येथील 76 कुटुंबातील 296, म्होप्रेतील 38 कुटुंबातील 215, खोडशी येथील 3 कुटुंबातील 12, रेठरे खुर्द येथील 120 कुटुंबातील 417,  कार्वेतील 14 कुटुंबातील 73, आटकेतील जाधवमळ्यातील 113 कुटुंबातील 742, कोपर्डे हवेली व मालखेड येथील एक कुटुंब, आटकेमधील 26 कुटुंबातील 130, चचेगाव 14 कुटुंबातील 46, केसेतील 3 कुटुंब, वस्ती साकुर्डी व सुपनेतील प्रत्येकी 13 कुटुंबातील 55 लोक, साजूर येथील 8 कुटुंबातील 38, कोडोली येथील 23 कुटुंबातील 97 लोक, गोवारेतील 10 कुटुंबातील 34 असे एकूण 30 गावांतील 1052 कुटुंबातील 4633 लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
नगरसेवकांनी वाचवले वृद्ध दाम्पत्यांचे प्राण
पुराच्या पाण्याने वेढा दिलेल्या कराड येथील कोयना दूध कॉलनीतील जिव्हेश्‍वर मंदिरात वृद्ध दांपत्य अडकून पडल्याचे समजताच नगरसेवक सौरभ पाटील, वैभव हिंगमिरे यांच्यासह अख्तर आंबेकरी, माजी नगरसेवक सुहास पवार, शिवाजी पवार, सचिन चव्हाण, सतीश भोंगाळे, महेश कदम, चंदू काशिद, महेश जुंबरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुराच्या पाण्याने वेढलेल्या या भागात चार फुटांपेक्षा अधिक पाणी होते. त्यातून वाट काढत व अग्निशमन विभागाचे अडसूळ, बांधकाम विभागाचे उपअभियंता रतन वाढई यांच्यासोबत जिव्हेश्‍वर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर पोहोचले. तेथे असणार्‍या वृध्दाच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना व्यवस्थितपणे बाहेर काढले.
तांबवे येथे एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य
कराड तालुक्यातील तांबवे गावाला चारी बाजूंनी पुराच्या पाण्याने वेढा दिला आहे. येथील परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. मंगळवारी स्थानिक नागरिकांच्या मदतीने, बोटीच्या सहाय्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, बुधवारी सकाळपासून पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने, शिवाय कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्यामुळे पुराचे पाणी काहीसे कमी झाले होते. या ठिकाणी एनडीआरएफच्या जवानांची टीम मदतकार्यासाठी दाखल झाली असून त्याला आपत्ती व्यवस्थापन पथक, स्थानिक ग्रामस्थांचीही चांगली साठ मिळाल्याने बचावकार्याने वेग घेतला आहे.
मालखेड ग्रामस्थांचे बेलवडे येथे स्थलांतर
मालखेड येथील लक्ष्मी-विष्णू मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे येथील सुमारे 40 पेक्षा जास्त कुटुंबातील लोकांचे बेलवडे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. तसेच येथील जनावरांनाही सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले असून त्यांना महामार्गावरील ब्रिज, जुने मालखेड व बेलवडे बुद्रुक येथे हलवण्यात आले आहे. बेलवडे बुद्रुक ग्रामस्थांकडून सामाजिक बांधिलकी जोपासत या स्थलांतरित ग्रामस्थांना नाष्टा व जेवणाची सोय करण्यात आली आहे.
रेठरे बुद्रुक, खुर्द येथे भयावह पूर परिस्थिती     
कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या रेठरे बुद्रुक येथेही पूर परिस्थितीने  गंभीर रूप धारण केले आहे. येथील बहुतांशी भाग पाण्याखाली गेला असून रेठरे मळी, बाजारपेठ व मालखेड बाजूकडील भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील वस्ती व नदीकाठच्या गावठाण भागातील सुमारे 50 हून अधिक कुटुंबांना ताराबाई विद्यालय, जिल्हा परिषद शाळेत हलवण्यात आले आहे. येथील खारे पानंद या एकाच रस्त्याने सध्या येथील ग्रामस्थांना शिवनगर (कृष्णा कारखाना) येथे जाण्यासाठी मार्ग उरला आहे. त्यामुळे इस्लामपूरशी गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला असून कार्वे येथील पूल पाण्याखाली गेल्यास रेठरे गावचा कराडशीही संपर्क तुटल्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापेक्षाही भयावह परिस्थिती रेठरे खुर्द गावाची झाली आहे. गावातील निम्म्यापेक्षा जास्त भागात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे येथील नागरिकांना वाठार परिसरात हलवण्यात आले आहे. मात्र, नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने दोन्ही गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित ग्रामस्थांनाही गावाबाहेर काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
अफवांवर विश्‍वास ठेवू नका
 सोशल मीडियावर राष्ट्रीय महामार्ग क्र.166 च्या  कराड-विटा मार्गावरील नवीन कृष्णा पुलाबाबत काही आक्षेपार्ह पोस्ट फिरत आहेत. मात्र, हा पूल वाहतुकीस सुस्थितीत आहे. पुरामुळे पुलाला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंत्यांनी सदर पुलाची पाहणी केली. त्यामध्ये पुलाला कोणतीही भेग अथवा फट आढळली नाही. त्यामुळे नवीन पूल पूर्णपणे वाहतुकीस सुरक्षित आहे.  नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंत्यांकडून करण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: