Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शेखरभाऊ गोरे यांचा उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
ऐक्य समूह
Friday, August 09, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: re4
5बिजवडी, दि. 8 : माण-खटाव तालुक्याचे युवा नेते शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर अनेक दिवस ते महायुतीतील भाजप, शिवसेना पक्षाच्या संपर्कात होते. मात्र माण विधानसभा मतदारसंघाची जागा कोणत्या पक्षाला सुटणार हे नक्की नसल्याने त्यांनी आजपर्यंत कोणतीही भूमिका जाहीर केली नव्हती. आज मातोश्रीवर शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
 यावेळी शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील, दगडूदादा सपकाळ, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, उपजिल्हा प्रमुख संजय भोसले, महाराष्ट्र रंग कामगार सेना अध्यक्ष धनाजी सावंत, शंकर वीरकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मुलाणी व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शेखर गोरेंसह सुनील जाधव, शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, गणेश सत्रे, दत्ता घाडगे, वैभव मोरे, शरद पवार, तेजस पवार, वीरकुमार गांधी, गजानन धडाबे, राहुल गोरे, पंढरीनाथ जाधव, प्रकाश महाडिक, दीपक पाटोळे, राजू इंगळे, राजू झगडे, संतोष देशमुख, विक्रांत देशमुख, दादा शिनगारे, राजू गायकवाड, नितीन घाडगे, राहुल जगदाळे, दादा मडके, सचिन कदम, अतुल पवार यांच्यासह माण तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
माण-खटाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सन 2014 साली महायुतीतर्फे रासप पक्षाकडून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी  दुसर्‍या क्रमांकाची 53 हजारांच्यावर मत घेतली होती. त्यांनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्याच्या जोरावर जनतेशी जोडलेले नाते मतांच्या रूपातून सर्वांनाच दाखवून दिले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवस रासपची बांधणी चांगल्या प्रकारे केली होती मात्र विकासकामाच्या मुद्द्यावर त्यांनी रासपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मतदारसंघात स्व. सदाशिव पोळ तात्यांच्या निधनानंतर अवकळा आलेल्या राष्ट्रवादीला गतवैभव मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका शेखर गोरे यांनी पार पाडली होती. विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. पक्षाची मते जास्त असतानाही मते फुटल्याने त्यांना पराभावाचा सामना करावा लागला होता. त्यांनी पराभवाने न खचता पुन्हा एकदा नव्या जोमाने मतदारसंघात पक्षाची ताकद वाढवण्यास सुरूवात करत विविध सत्तास्थाने ताब्यात घेत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला होता. सन 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचाच आमदार असणार अशी परिस्थिती शेखर गोरे यांनी निर्माण केली असतानाही   राष्ट्रवादी व पक्षश्रेष्ठींकडून सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याबाबत शेखर गोरे जाहीरपणे नाराजी व्यक्त करत होते. याबाबत फलटणला राष्ट्रवादीच्या संवाद मेळाव्यात विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना व त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांची मते मांडू दिली नाहीत. त्यामुळे या मेळाव्यात झालेला राडा राज्यभर गाजला. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासमोर झालेला राडा शेखर गोरेंना दिल्लीपर्यंत घेऊन गेला. त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आपली ताकद दाखवून देण्याचा निर्धारच केला.  लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराचे काम करून आपला निर्धार सार्थकीही लावला. त्यांचे काम महायुतीच्या पक्षश्रेष्टींकडे पोहचले. याची दखल घेत त्यांनी महायुतीत सामील व्हावे असे पक्षश्रेष्टींकडून त्यांना आवाहन करण्यात आले होते. ते गेले काही दिवस भाजपाबरोबरच शिवसेनेच्याही संपर्कात होते. आज त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने माण मतदारसंघात शिवसेनेला पूर्वीचे चांगले दिवस येणार आहेत.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: