Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिरवळ ते कराड दरम्यान दहा हजार वाहने अडकली
ऐक्य समूह
Friday, August 09, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: lo1
वाहनचालक, प्रवाशांच्या नाष्टा-जेवणासाठी पोलिसांचा पुढाकार
5सातारा, दि. 8 : पुणे ते बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शिरवळ ते कराड दरम्यान गुरुवारी तब्बल 10 हजार वाहने अडकून पडली आहेत. अडकून पडलेले वाहनचालक, प्रवाशांच्या नाष्टा- जेवणासाठी सातारा पोलिसांनी पुढाकार घेत माणुसकीची चुणूक दाखवून दिली. दरम्यान याच महामार्गावर वाठार, जि. सांगली येथे महामार्गावर पाच फूट पाणी आल्यामुळे कराडच्या पुढे वाहने घेऊन जाऊ नयेत, असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी केले आहे.
मुसळधार पाऊस झाल्यामुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यामुळे पाटण, कराड शहरात तसेच सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या आहेत. त्याबाबत सातारा जिल्हा पोलीस दलही सतर्क झाले असून नागरिकांसह वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सातारा जिल्ह्याच्या हद्दीत नदीवर असणार्‍या पुलांवर पोलीस तैनात करण्यात आले असून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख हे जातीने लक्ष ठेवून आहेत. दोन दिवसात जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाहनांना कोणत्याही दुर्घटनेला बळी पडू लागू नये, जीवित अथवा आर्थिक हानी होऊ नये यादृष्टीने पावले टाकत सातारा पोलीस दलाने पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ ते कराड दरम्यान गुरुवारी 10 हजार वाहने थांबवून ठेवली आहेत. वाहनचालक व प्रवाशांना नाष्टा आणि जेवण उपलब्ध करून देण्याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिकांनी नाष्टा व जेवणासाठी पुढाकार घेतला. आनेवाडी टोल नाका, खंडाळा, बोरगाव, तासवडे टोल नाका या ठिकाणी थांबविण्यात आलेले वाहनचालक व प्रवाशांना सातारा पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी स्वतः जेवण वाढत आपल्यातील माणुसकीचे दर्शन घडविले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: