Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हरित लवादाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल
ऐक्य समूह
Friday, August 09, 2019 AT 11:10 AM (IST)
Tags: re3
5वाई, दि. 8 ः  हरित लवादाने कृष्णा नदी पात्रातील बेडिंगसाठी सिमेंट काँक्रीट केल्याबद्दल पालिकेला 25 लाख रुपये नुकसानभरपाई जमा करण्याबाबत दिलेल्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्याचा निर्णय आज नगरपालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला.
पालिकेची विशेष सभा नगराध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी सौ. विद्या पोळ उपस्थित होते.
सभा सुरू होण्यापूर्वीच उपाध्यक्ष सावंत यांनी महागणपती मंदिरालगतच्या नदीपात्राच्या दक्षिण बाजूस बेडिंगसाठी सिमेंट काँक्रीट केलेल्या कामाबाबत राष्ट्रीय हरित लवादाने पालिकेस 25 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिल्याचा उल्लेख केला.  
ज्या व्यक्तीने न्यायालयात केस दाखल केली आहे तो वाईकर नागरिक आहे. त्याने एका संस्थेला पुढे करून वाई नगरपरिषदेवर केस दाखल केली. ही माहिती नगराध्यक्ष व प्रशासन प्रमुखांना होती. या केससाठी पालिकेच्यावतीने त्यांनी अ‍ॅड. गदेगावकर यांची नियुक्ती केली होती. ही माहिती सर्व नगरसेवकांना न देता माहिती लपवून ठेवून केस विरोधी जाण्यासाठी नगराध्यक्षांनी संबंधित व्यक्तीस म्हणजे मकरंद शेंडे व त्याच्या साथीदारांना मदत केली, असा आरोप सावंत यांनी केला. नगराध्यक्षांनी आज घेतलेली सभा केस दाखल झाल्यानंतर घेणे अपेक्षित होते. केस सुरू असताना एका त्रिसदसीय समितीने सदर कामास भेट दिली होती. त्यावेळी मी उपनगराध्यक्ष म्हणून व काही नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देवून वस्तुस्थितीची माहिती दिली; परंतु नगराध्यक्षा जाणीवपूर्वक उपस्थित राहिल्या नाहीत. यावरून त्यांना या कामाविषयी तळमळ नसल्याचे त्यांनी सांगितले.
तद्नंतर हरित लवादाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याकामी सात नगरसेवकांची समिती नेमण्यात आली. यामध्ये नगराध्यक्षा डॉ. शिंदे, उपगनराध्यक्ष सावंत, विरोधी पक्षनेते सतीश वैराट, नगरसेवक अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण, चरण गायकवाड, महेंद्र धनवे, राजेश गुरव यांचा समावेश करण्यात आला. सभेत झालेल्या चर्चेत नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, महेंद्र धनवे, सतीश वैराट, अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण यांनी सहभाग घेतला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: