Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कराड तालुक्यातील महापूर स्थिती आटोक्यात नदीपात्रातील पाणी पातळीत घट
ऐक्य समूह
Saturday, August 10, 2019 AT 11:30 AM (IST)
Tags: re2
5कराड, दि. 9 : कराड शहरासह तालुक्यातील कृष्णा-कोयना नदीच्या महापुराची स्थिती शुक्रवारी निवळली आहे. दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय घट होत आहे. दरम्यान, शुक्रवारी नगरपालिकेसह विविध संस्थांनी यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ, प्रीतिसंगम बागेसह शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली.  दुपारी अडीच वाजल्यापासून कोयना धरणातून होणारा विसर्ग 68 हजार क्युसेक्सवरुन 77 हजार क्युसेक्सपर्यंत वाढवण्यात आल्यामुळे कृष्णा-कोयनेच्या पात्रात आणखी वाढ होवू शकते, हे गृहीत धरुन प्रशासन अजूनही हाय अलर्टवर आहे.
गेल्या आठवडाभरापासून कराडला कृष्णा-कोयना नदीच्या महापुराचा फटका बसला होता. शहराच्या तीन बाजूने पुराचे पाणी घुसल्यामुळे शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची वेळ आली होती. सुदैवाने गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरल्यामुळे कृष्णा-कोयनेचे पाणी शहरातून मागे हटण्यास सुरुवात झाली होती. शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत दिल्यामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय घट दिसून आली.
चार दिवस पुराच्या पाण्याखाली राहिल्यानंतर शुक्रवारी पहाटे यशवंतराव चव्हाण समाधी स्थळावरुन पाणी पूर्णपणे मागे हटले. त्यामुळे नगरपालिका प्रशासन तसेच विविध सामाजिक संस्थांनी समाधीस्थळ तसेच प्रीतिसंगम बागेच्या सफाईची मोहीम हाती घेतली होती. यामध्ये नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांसह नगराध्यक्षा, नगरसेवकांनीही सहभाग घेतला. नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी शहरातील दत्त चौक, यशवंत हायस्कूल, पाटण कॉलनी आदी परिसराचीही स्वच्छता केली.
कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी घट झाल्यामुळे कराड ते विटा राज्य मार्गावरील नवीन कृष्णा पुलावरील वाहतूकही सुरळीत झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच पुराच्या पाण्यामुळे कोसळलेला जुना कृष्णा पूल आता दिसू लागला आहे. चार दिवस पुराच्या पाण्याखाली राहिल्यामुळे पुलाचे उर्वरीत अवशेषही मोडकळीस आले आहेत. या पुलाचे फूटपाथ तसेच रेलिंगही पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. अनेक ठिकाणी वाकडे झाल्यामुळे उरलासुरला पूलही मोडून पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कराड तालुक्यातील तांबवे गावातील पूरस्थितीही शुक्रवारी काही प्रमाणात सुधारली. दुपारी माजी आ. विक्रमसिंह पाटणकर, वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांनी गावास भेट देवून ग्रामस्थांची विचारपूस केली. कोयना नदीच्या पाणीपात्रात घट झाल्यामुळे गावात घुसलेले पाणी ओसरले असले तरी जुना कोयना पूल अजूनही पाण्याखालीच आहे. गावात स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. गावातील अनेक घरांची पडझड झाली असून महसूल प्रशासनाच्यावतीने नुकसानीच्या पंचनाम्याचे काम हाती घेण्यात आले आहे. कोल्हापूरकडे जाणारा पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग अजूनही पंचगंगा नदीच्या महापुराखाली असल्यामुळे सातारा तसेच कोल्हापूरच्या दिशेने महामार्गावर ठिकठिकाणी शेकडो ट्रक्स उभे आहेत. कराड परिसरातील सामा-जिक संस्था तसेच ग्रामस्थांकडून ट्रकचालकांना फूड पॅकेट्स तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले जात आहे. खा. उदयनराजे भोसले, आ. अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आदींनी कराडच्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: