Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आठवड्याचे पाचही दिवस अयोध्येची सुनावणी होणार
ऐक्य समूह
Saturday, August 10, 2019 AT 11:27 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 9 (वृत्तसंस्था) : अयोध्या प्रकरणाची दररोज सुनावणी न करण्याची मुस्लिम पक्षकारांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. प्रत्येक आठवड्यात सोमवार ते शुक्रवारपर्यंत पाचही दिवस अयोध्या प्रकरणाची सुनावणी करण्यात येणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणावर आठवड्यातून पाच दिवस दररोज सुनावणी होणार आहे.
अयोध्या प्रकरणावर दररोज सुनावणी करण्यास मुस्लिम पक्षकारांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. या प्रकरणावर बाजू मांडण्यासाठी  तयारी करण्यास वेळ मिळाला नसल्याचे मुस्लिम पक्षकारांनी न्यायालयाला सांगितले. मात्र न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद फेटाळून लावला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायामूर्ती एस. ए. बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण आणि एस. अब्दूल नजीर यांच्या पाच सदस्यांच्या घटनापीठा समोर अयोध्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आठवड्यातून पाच दिवस सुनावणी करणे हे अमानवीय आहे. एवढ्या घाईने सुनावणी करणे योग्य नाही. असे असेल तर मला नाईलाजाने हा खटला सोडावा लागेल, असे मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी सांगितले. त्यावर तुमचं म्हणणे ऐकून घेण्यात आलय, त्याबाबत नंतर चर्चा करू, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: