Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आपदग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 11:02 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : पूर परिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरित करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे, आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर उपस्थित होते.
बाधित नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणी पुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या  पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. बाधीत गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्वच्छतेच्या मोहिमेसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. बाधीत गावांमध्ये औषधांची फवारणी, पूर परिस्थितीमुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबीयांना दैनंदिन आर्थिक मदत तसेच पेट्रोल, डिझेल व गॅस पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. खंडित वीज पुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. महामार्गांवर ज्या ठिकाणी वारंवार पाणी साचून वाहतूक बाधीत होते, अशा ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबत सूचना दिल्या. राज्यातील 10 जिल्ह्यात पूर परिस्थिती असून 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4,47,695 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरएफ 32 टीम, एसडीआरएफ 3 टीम, आर्मी 21 टीम, नेव्ही 41, कोस्ट गार्ड 16 टीम राज्यात कार्यरत आहेत. 226 बोटीद्वारे बचावकार्य सुरु आहे.
कोल्हापूर येथे पाण्याची पातळी 1 फूट 11 इंचाने व सांगलीतील पाण्याची पातळी 3 फुटाने ओसरली आहे. शिरोळ येथे 62.9 फूट पाण्याची पातळी आहे. अलमट्टी धरणामध्ये 6 लाख 8 हजार 33 क्युसेक्स इन फ्लो असून विसर्ग 5 लाख 70 हजार क्युसेक्स आहे. पुणे विभागातील 27 तालुके बाधित असून 585 गावांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये 2 महानगरपालिका आणि 15 नगरपालिकांचा समावेश आहे. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून 4 लाख 13 हजार 985 नागरिकांना 535 आश्रय शिबिरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 51 पथके, 95 बोटी व 569 जवानांमार्फत बचाव कार्य सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 54 पथके, 74 बोटी आणि 456 जवानांमार्फत बचाव कार्य सुरु आहे. सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यात 150 आणि सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
सांगली जिल्ह्यात 66 रस्ते वाहतुकीसाठी बंद असून 33 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 91 रस्ते वाहतुकीसाठी बंद असून 39 पूल पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात 5 रस्ते वाहतुकीसाठी बंद असून 3 पूल पाण्याखाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात 33 रस्ते बंद असून 14 पूल पाण्याखाली आहेत.
राज्यात आज अखेर 802.70 मि.मी. पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या 109.43 टक्के आहे. मागील वर्षी यावेळी ती 79.22 टक्के होती. राज्यात आतापर्यंत 58 टक्के पाणीसाठा पावसामुळे निर्माण झाला आहे. जायकवाडी धरण 80 टक्के तर उजनी धरण 100 टक्के भरलेले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांना दिली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: