Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
संकटकाळी निवडणुकांचा विचार तरी कसा येतो?
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 11:24 AM (IST)
Tags: mn5
उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : पूरग्रस्त बांधवांसाठी आपण पूर्ण ताकदीनिशी उभे राहायला हवे, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. संकटकाळी निवडणुकांचा विचार तरी कसा येतो, असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी   मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला हाणला. पुराच्या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणुका पुढे ढकला, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले.
आज दुपारी शिवसाहित्य मदतीचे ट्रक, रुग्णवाहिका शिवाजी पार्क, दादर येथून सांगली, कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, औषधे, खाण्याचे साहित्य अशी मदत शिवसेनेतर्फे करण्यात आली. या संदर्भातील माहिती घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषदेत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांना पुरासंदर्भात होत असलेल्या राजकारणाविषयी विचारले असता त्यांनी त्याविषयी आता काही बोलण्याची वेळ नाही, असे म्हणत उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, मला राजकारणात पडायचे नाही. जे जे आवश्यक आहे, ते करणे मला महत्त्वाचे वाटते. आधी ज्यांची घरे वाहून गेली आहेत त्यांना मदत करणे गरजेचे आहे. वातावरणात बदल होत आहे. मुंबईतही महिनाभराचा पाऊस एका दिवसात पडला. या विषयीचा विचार, त्यावर मात करणारी यंत्रणा निर्माण करण्यासाठी तज्ज्ञांनी विचार करायला हवा, असे मतही त्यांनी व्यक्त केले. यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: