Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकचा ‘समुद्री जिहाद’चा कट ; नौदल हायअलर्टवर
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: na2
5नवी  दिल्ली, दि. 11 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याने पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. यामुळे पाक दहशतवाद्यांना भारतावर हल्ला करण्यासाठी चिथावणी देत आहे. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनीही पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्यांचा इशारा दिला होता. आता पाकमधील दहशतवादी संघटना ‘समुद्री जिहाद’चा कट रचत असल्याची माहिती भारताच्या गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय नौदलाला हायअलर्ट देण्यात आला आहे. तसेच कुठल्याही हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे नौदलाने म्हटले आहे.
समुद्र किनार्‍यावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारचा हल्ला परतवून लावण्यासाठी समुद्रात बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. नौदलाला आम्ही हायअलर्ट दिला आहे. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आम्ही तयार आहोत. कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला संपूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल, असे भारतीय नौदलाचे व्हाइस अ‍ॅडमिरल मुरलीधर पवार यांनी सांगितले. दिल्लीतील एका कार्यक्रमात पवार बोलत होते. पाकमधील दहशतवादी संघटना आपल्या हस्तकांना ‘समुद्री जिहाद’मध्ये समुद्र मार्गाने हल्ला करण्याचे प्रशिक्षण देत आहेत, अशी माहिती पवार यांनी दिली.
गुप्तचर यंत्रणांच्या इशार्‍यानंतर भारतीय नौदलाच्या सर्व तळांना हायअलर्ट देण्यात आला आहे. यासह भारतीय लष्कर आणि हवाई दलही अ‍ॅलर्टवर आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: