Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे दरवाजे साडेसात फुटांवर
ऐक्य समूह
Monday, August 12, 2019 AT 11:29 AM (IST)
Tags: re2
5पाटण, दि. 11 : कोयना पाणलोट क्षेत्रात रात्रीच्या वेळी पावसाचे प्रमाण वाढत असल्याने कोयना जलाशयात येणार्‍या पाण्याची आवकही वाढत आहे. तर कोयना धरणातील पाणी साठवण क्षमता संपल्याने धरणातील पाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सातत्याने धरणाचे दरवाजे कमी-जास्त करावे लागत आहेत. शनिवारी रात्री झालेल्या पावसाने धरणातील आवक वाढल्याने कोयना धरणाचे दरवाजे शनिवारी रात्री 12.15 वाजता 6 फुटांवर तदनंतर रविवारी सकाळी 10 वाजता साडेसात (7.6) फुटांवर करण्यात आले असून 65 हजार 844 क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
दरम्यान, गेल्या दहा ते पंधरा दिवसात कोयना परिसरात पडलेला हा सर्वाधिक उच्चांकी पाऊस आहे. तर मुसळधार पावसाचे माहेरघर समजल्या जाणार्‍या कोयना धरणातून आजपर्यंत जवळपास 55 टीएमसी पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात आला आहे. दि. 4 ते 8 ऑगस्ट दरम्यान कोयना धरणात 43.17 टीएमसी पाणी आले.
पाटण तालुक्यासह कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र कोयना पाणलोट क्षेत्रात रात्रीच्या प्रसंगी पावसाचे प्रमाण वाढत असल्याने कोयना जलाशयात येणार्‍या पाण्याची आवकही वाढत आहे. 105 टीमसी क्षमता असणार्‍या कोयना धरणात सध्या 103.40 टीमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाची पाणी साठवण क्षमताही आता संपली आहे. रात्रीच्या प्रसंगी अचानक पावसाचे प्रमाण वाढले, की जलाशयात  येणार्‍या पाण्याची आवकही वाढत आहे. त्यामुळे धरणात येणारे अतिरिक्त पाणी सोडून दिल्याशिवाय धरण व्यवस्थापनेला गत्यंतर नाही. शनिवारी रात्री कोयना धरण परिसरात पावसाचे प्रमाण वाढल्याने 65 हजार 919 क्युसेक्स पाणी धरणात येत होते. त्यामुळे रात्री धरणाचे गेट 5 फुटांवरून 6 फुटांवर करण्यात आले. तदनंतरही आवक वाढतच असल्याने रविवारी सकाळी 10 वाजता कोयना धरणाचे दरवाजे 6 फुटांवरून साडेसात फुटांवर करण्यात आले आहेत. सध्या धरणाच्या गेटमधून 65 हजार 844 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात 103.40 टीमसी पाणीसाठा झाला असून 2162.1 फूट जलपातळी झाली आहे. तर रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 39, नवजा 15 आणि महाबळेश्‍वर येथे 21 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिपर्जन्यष्टी होत असलेल्या प्रतापगड, बामणोली, काठी, वळवन येथेही पावसाचे प्रमाण कमी आहे. मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने कोयना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन नदीवरील मूळगाव, निसरे बंधारा, संगमनगर (धक्का) पूल पुन्हा पाण्याखाली गेले आहेत. येथील लोकांचा पाटणशी संपर्क तुटला आहे. कोयना धरणातून सातत्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने पाटणमध्ये पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होते, की काय अशी भीती लोकांच्या मनात घर करून राहिली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: