Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दिल्ली-लाहोर बससेवा रद्द
ऐक्य समूह
Tuesday, August 13, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) ः भारताने पाकिस्तानवर पलटवार करताना पाकिस्तानच्या कारवाईला जशास तसे उत्तर दिले आहे. पाकिस्तानकडून बंद करण्यात आलेली समझोता एक्स्प्रेसनंतर भारताने दिल्ली-लाहोर बससेवा सोमवारी रद्द केली. दिल्ली परिवहन महामंडळ (डीटीसी) ने आज याची माहिती दिली.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळणारे कलम 370 भारताकडून रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने आगपाखड करत भारताच्या या निर्णयाच्या विरोधात समझोता एक्स्प्रेस बंद करण्याचा निर्णय घेतला.
पाकिस्तानकडून भारत-पाक यांच्यातील समझोता एक्स्प्रेस बंद करण्यात आली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद यांनी समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याची घोषणा केली होती. गुरुवारी पाकिस्तानने वाघा बॉर्डरवर ही एक्स्प्रेस थांबवली आणि आपल्या ट्रेनचा चालक आणि गार्डला समझोता एक्स्प्रेससोबत भारतात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजस्थान सीमेमार्फत भारतात येणारी ‘धार एक्स्प्रेस’ सुद्धा पाकिस्तानकडून बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती. पाकिस्तानने गुरुवारी दिल्ली-लाहोर बस सेवा बंद करण्याचा देखील निर्णय घेतला. गुरुवारी सायंकाळी दिल्लीहून लाहोरकडे निघालेल्या पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या बसमध्ये अवघे चार प्रवासी होते. पाकिस्तानच्या या एकतर्फी निर्णयानंतर भारताने आज दिल्ली-लाहोर ही बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सोमवारी सकाळी सहा वाजता ही बस लाहोरसाठी रवाना होणार होती. परंतु, बससेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्ली-लाहोर बस सेवेची सुरुवात 1999 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: