Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाककडून लडाख सीमेजवळ लढाऊ विमाने तैनात करण्याच्या हालचाली
ऐक्य समूह
Tuesday, August 13, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था): भारताने काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून सातत्याने आक्रमकतेची भाषा सुरू आहे. पाकिस्तानने युद्धाचे देखील इशारे दिले आहेत. पाकिस्तानकडून आता लडाख जवळच्या स्कारदू येथील तळावर फायटर विमाने तैनात करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पाकिस्तानने लडाख जवळ असणार्‍या तळाजवळ आवश्यक युद्ध साहित्य आणण्यास सुरुवात केली आहे. भारताने गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहात कलम 370 रद्द करण्याचे आणि जम्मू-काश्मीरचे दोन भागांमध्ये विभाजन करणारे विधेयक मंजूर केले. लडाखलाही केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले आहे.
भारताने घेतलेल्या या निर्णयानंतर पाकिस्तानकडून सातत्याने आदळआपट सुरू आहे. संयुक्त राष्ट्रासह जगातील वेगवेगळ्या देशांकडे धाव घेऊनही पाकिस्तानला कोणीही साथ दिलेली नाही. पाकिस्तानी एअर फोर्सच्या सी 130 या मालवाहतूक विमानांमधून शनिवारी स्कारदू तळावर आवश्यक साहित्य उतरवण्यात आले. सीमावर्ती भागात पाकिस्तानच्या सुरू असलेल्या या हालचालींवर भारतीय सैन्य दलांचे अत्यंत बारीक लक्ष आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. पाकिस्तानने स्कारदू तळावर फायटर विमानांना लागणारे साहित्य आणले असण्याची शक्यता आहे.
स्कारदू तळावर पाकिस्तान जेएफ-17 विमाने तैनात करण्याची शक्यता आहे. भारतीय एअर फोर्स आणि सैन्य दलाच्या सहकार्याने भारतीय गुप्तचर  यंत्रणांचे पाकिस्तानवर लक्ष आहे. उपग्रह आणि अन्य यंत्रणांमुळे पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात चालणार्‍या हालचाली भारताच्या नजरेतून सुटण्याची शक्यता कमी आहे. सी-130 हे अमेरिकन बनावटीचे मालवाहतूक विमाने आहे. अमेरिकेने बर्‍याच वर्षांपूर्वी पाकिस्तानला हे विमान दिले होते.
भारतावर दबाव टाकण्यासाठी पाकिस्तानी एअर फोर्स आणि लष्कर युद्ध सराव सुद्धा करू शकते. स्कारदू येथील तळावर फायटर विमाने तैनात करणे त्याच रणनितीचा एक भाग असू शकतो. यापूर्वी बालाकोट एअर स्ट्राइकनंतर 27 फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तानच्या फायटर विमानांमध्ये काश्मीरमध्ये डॉगफाइट झाली होती. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी क्षेपणास्त्र डागून पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ-16 विमान पाडले होते.  त्यांचे मिग-21 विमान पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोसळल्यामुळे ते पाकिस्तानच्या हाती लागले होते. त्यावेळी भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे पाकिस्तानला दोनच दिवसात विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करावी लागली होती.
  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: