Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बाजार गडगडला;सेन्सेक्स, निफ्टीत मोठी घसरण
ऐक्य समूह
Wednesday, August 14, 2019 AT 11:05 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : जगभरात झालेल्या उलाढालीचे पडसाद भारतात उमटले असून आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. दुपारी 3 पर्यंत सेन्सेक्स 600 अंकांच्या घसरणीसह 37 हजारांच्या खाली आला तर निफ्टी 176 अंकांच्या घसरणीसह 11 हजारांच्या खालीपर्यंत आला.
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा 30 शेअरचा सेन्सेक्स 173 अंकाने उसळून तो 37 हजार 755 अंकांवर उघडला. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली.  
येस बँकेचे शेअर 52 आठवड्याच्या खाली घसरले तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सने या दशकातील सर्वात मोठी उसळी घेतली. 18 महिन्यांच्या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रिजवरील सर्व कर्जे फेडली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी येथे केली. सौदी अरामको ‘आरआयएल’च्या ओटूसी अर्थात ऑइल टू केमिकल उद्योगातील 20 टक्के भागभांडवल खरेदी करणार असून त्याचे एकूण मूल्य 75 अब्ज डॉलर (अंदाजे 5, 32, 466 कोटी) इतके आहे आणि पुढील महिन्यात रिलायन्सच्या जिओ फायबरची सुरुवात होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आल्याने या सर्वांचा फायदा रिलायन्सला झाला. त्यामुळे आज बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर वधारल्याचे पाहायला मिळाले.
सोमवारी बकरी ईदमुळे देशातील प्रमुख शेअर बाजार बंद होते. यापूर्वी शुक्रवारी शेअर बाजारात नियमित व्यापार झाला. शुक्रवारी सेन्सेक्स 254 अंकांच्या उसळीसह 37 हजार 581 अंकांवर बंद झाला होता तर निफ्टी 77 अंकांच्या झेपेसह 11 हजार 109 अंकांवर बंद झाला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: