Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीर निर्बंधावरील आव्हान याचिकेवर तत्काळ सुनावणी नाही
ऐक्य समूह
Wednesday, August 14, 2019 AT 11:18 AM (IST)
Tags: na2
5नवी  दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने जम्मू-काश्मीरमध्ये लादण्यात आलेल्या निर्बंधांना आव्हान देणार्‍या याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘जम्मू-काश्मीरचा विषय संवेदनशील असून तेथील परिस्थिती सुधारण्यासाठी वेळ द्यायला हवा. या प्रकरणी दोन आठवड्यानंतर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 हटविण्याचा निर्णय नुकताच केंद्र सरकारने घेतला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून सरकारने प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. राजकीय नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. इंटरनेट, टेलिफोन बंद आहेत तसेच जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या विरोधात तहसीन पुनावाला यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून निर्बंध उठवण्याची मागणी केली होती. न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्या. एम. आर. शहा व न्या. अजय रस्तोगी यांच्या खंडपीठापुढे आज त्यावर सुनावणी झाली. अ‍ॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी आज केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली.   
‘2008 आणि 2016 मध्येही काश्मीरमध्ये संचारबंदी लादण्यात आली होती. तेव्हा काश्मीरमध्ये स्थिती पूर्ववत होण्यासाठी महिना लागला होता. 2016 मध्ये तर 37 हून अधिक नागरिक मृत्युमुखी पडले होते. मात्र, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थिती पूर्ववत होण्यास काही वेळ लागेल. त्यामुळे सर्व निर्बंध आताच उठवले जाऊ शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
खंडपीठाने त्यांचा युक्तिवाद मान्य केला. काश्मीरमधील परिस्थिती एका रात्रीत बदलू शकत नाही, हे मान्य आहे. मात्र, ही संचारबंदी अजून किती दिवस राहील, असा प्रश्‍न खंडपीठाने केला. त्यावर सरकार पूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. लवकरात लवकर परिस्थिती सुधारावी, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले. त्यावर दोन आठवड्यांनंतर परिस्थिती पाहून या प्रकरणी हस्तक्षेप करायचा की नाही याचा निर्णय घेऊ,’ असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे पुढील दोन आठवडे काश्मीरमधील निर्बंध ‘जैसे थे’ राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: