Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
गणेशोत्सव नियोजन बैठकीत अतिक्रमणांच्या मुद्द्याला धार
ऐक्य समूह
Wednesday, August 28, 2019 AT 11:33 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 27 : शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये शहरातील फुटपाथवरील अतिक्रमणांच्या मुद्द्यासह ठिक ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यांवर शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, सामाजिक कार्यकर्ते चिन्मय कुलकर्णी, मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार यांनी प्रशासनाला धारेवर धरले. दरम्यान, सातारा शहरात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेली डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना यापुढेही सुरू ठेवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आज दुपारी 12 वाजता गणेशोत्सव आणि मोहरम सणाच्या पार्श्‍वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक जिल्हाधिकारी श्‍वेता सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीपकुमार जाधव, मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत पार पडली.
धनंजय जांभळे म्हणाले, साताराशहरामध्ये सध्या ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असून या कामानजीक असणार्‍या रस्त्यांवरील खड्ड्यांचा विषय अत्यंत गहन झाला आहे. त्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करून काही उपयोग होत नाही. खड्ड्यांमुळे दुर्घटनेची शक्यता लक्षात घेऊन तातडीने खड्डे मुजवण्यात यावेत. बोगद्याची अवस्थाही अत्यंत बिकट झाली असून दिवे नसल्यामुळे अपघाताचा धोका आहे. अनंत चतुर्दशी दिवशी संगम माहुली येथे निर्माण होणारा वाहतूक कोंडीचा प्रश्‍न कसा सुटेल यावर उपाययोजना कराव्यात. गणेश मूर्तींचे एका ठिकाणी विसर्जन व्हावे, अशा मागण्या त्यांनी केल्या.
नरेंद्र पाटील म्हणाले, शहरांमध्ये अतिक्रमणांचा विषय गंभीर बनला आहे. बसस्थानक परिसरामध्ये फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्यामुळे नगरिकांना नाहक त्रास होत आहे. फुटपाथवर मटक्यांच्या टपर्‍या राजरोसपणेचालवल्या जात आहेत. राधिका रोडवर असणार्‍या वाईनशॉपच्याबाहेर खाद्यपदार्थ, अंडी विकणार्‍या व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली असता ते पोलिसांचे खबरे आहेत, अशी उत्तरे दिली जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राहुल पवार म्हणाले, शहरातील फुटपाथ हे प्रवाशांसाठी आहेत का अतिक्रमणधारकांसाठी हे प्रशासनाने स्पष्ट करावे. ही अतिक्रमणे तातडीने काढण्यात यावीत.
चिन्मय कुलकर्णी म्हणाले, मरिआई कॉम्प्लेक्स येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी अनेक वेळा बांधकाम विभागाकडे करूनही त्याची दखल घेतली जात नाही.
शरद जाधव म्हणाले, देखावे पाहण्यासाठी सुमारे दहा किलोमीटर अंतरावरून लोक येतात. ज्यांची स्वतःची वाहने आहेत, त्यांची अडचण होत नाही.  जे एस.टी.ने येतात त्यांना परत जाण्यासाठी बस नसल्याने अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. परत जाण्यासाठी रात्री उशिरा एस. टी. सोडण्यात यावी.
हेमंत सोनवणे म्हणाले, विसर्जनासाठी तळे बांधले जाते मात्र आठ दिवसानंतर गणेश मूर्ती उघड्या पडतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्या मूर्तींची विटंबना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच परिस्थिती दुर्गा देवी मूर्तींचीही पाहायला मिळते. त्यामुळे मूर्ती विसर्जनासाठी कायमचे तळे बांधण्यात यावे. कल्याणी शाळेजवळ सध्या मूर्ती विसर्जनासाठी तळे खोदले जात असून त्या तळ्यामध्ये गोडोली येथून येणारे ड्रेनेजचे पाणी सोडले आहे. अशा परिस्थितीत मूर्तींचे विसर्जन करायचे का असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.  
केदार आफळे यांनी पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी मागणी केली.
स्मिता घोडके यांनी क्रमानुसार मूर्ती विसर्जनाला नेण्यात याव्यात, अशी सूचना करून बाजारपेठेमध्ये चार चाकी वाहनांना पार्किंग प्रतिबंधित करावे अशी मागणी केली.
माधवी कदम म्हणाल्या, नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या-वतीने शहरातील राधिका रोड, जुने आर.टी.ओ. कार्यालय रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे. पावसाची शक्यता गृहित धरून इतर ठिकाणचे खड्डे भरलेले नाहीत. मुसळधार पाऊस पडल्यास पुन्हा ते खड्डे भरावे लागतील. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी दोन दिवस अगोदर शहरातील सर्व खड्डे मुजवण्यात येतील.
श्‍वेता सिंघल म्हणाल्या, या बैठकीत ज्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या तक्रारींचे संबंधित विभागांनी तत्काळ निवारण करावे. गणेशोत्सव व मोहरम शांततेमध्ये साजरा करण्यासाठी सर्वांच्याच पुढाकाराची गरज आहे. ज्या ठिकाणी रस्त्यांवरील फांद्या तोडण्याची आवश्यकता असेल, त्या ठिकाणच्या झाडाच्या फांद्या तोडाव्यात.
ज्या धोकादायक पुलांबाबत भीती व्यक्त केली गेली. त्या पुलांची पाहणी बांधकाम विभागाने करून त्याचा अहवाल तातडीने माझ्याकडे पाठवून द्यावा. देखावे पाहण्यासाठी येणार्‍या ग्रामीण भागातील रात्री उशिरा जाण्यासाठी एस. टी. बसेसची सोय केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्रिशंकू भागात खड्डे मुजवण्याबाबत बैठकीत झालेल्या मागणीबाबत बोलताना त्या म्हणाल्या, बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी तत्काळ त्या भागातील रस्त्यांची पाहणी करून ते खड्डे भरून घ्यावेत. निधीची अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साधावा. त्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: