Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चालकाची सव्वा दोन लाखाची फसवणूक
ऐक्य समूह
Friday, August 30, 2019 AT 11:15 AM (IST)
Tags: lo2
5सातारा, दि. 29 : एका ट्रॅव्हल बसमध्ये गोव्याला जाण्यासाठी बसलेल्या चार अनोळखी प्रवाशांनी सातार्‍यानजीक खिंडवाडी हद्दीत ट्रॅव्हल बस हॉटेल राजेशाही येथे थांबल्यानंतर चालकाला आम्ही पोलिसांचे बातमीदार आहोत तसेच फूड डिपार्टमेंटचे कर्मचारी असल्याचे सांगत धमकावले. नंतर गाडीतील डिकीत असलेली 2 लाख 16 हजार रुपयांची बर्फी व खवा पोलीस ठाण्यात जमा करतो असे सांगत त्याच्याकडून 5 हजार रुपये घेतले व एका टेम्पोत माल भरून पोबारा केल्याची घटना घडली.
याबाबत ट्रॅव्हल बसवरील चालक संतोष पांडुरंग धारगलकर (वय 40), रा. शिवोलीमओशेल बार्देश,  गोवा याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ऑगस्ट रोजी ट्रॅव्हल चालक संतोष धारगलकर हा गोव्याकडे निघाला होता. त्यावेळी त्याच्या गाडीत खव्यापासून तयार केलेल्या बर्फीचा माल तसेच खवा होता. यावेळी त्याच्या मोबाईलवर कॉल आला. गोव्याला जायचे असल्याचे सांगत आम्ही ओळखीचे पॅसेंजर असल्याचा आव आणला व चालकाचा विश्‍वास संपादन केला. यानंतर बस सातारा येथील बाँबे रेस्टारंट येथे आल्यावर अनोळखी चार जण गाडीत चढले. गाडीत प्रवेश केल्यानंतर  त्यांनी आम्ही फूड डिपार्टमेंटचे कर्मचारी आहोत. पोलिसांचे बातमीदार आहोत असे भासवून चालकाला दमदाटी व शिवीगाळ केली.  त्याच्याकडून 5 हजार रुपये घेतले. या अनोळखींनी नंतर  बस क्रमांक (जीजे 05 ए व्ही 8887) च्या डिकीत असलेली 2 लाख 16 हजार रुपये किंमतीची गायत्री स्पेशल बर्फीची पॅकिंग तसेच जयवीर जयरामसिंग बघेल, रा. सांगली यांचा खव्याचा माल सातारा शहर पोलीस ठाण्यात जमा करतो असे सांगितले. 
त्यानंतर या अनोळखी संशयितांनी छोटा हत्ती टेम्पो क्र.(एम. एच. 12 जीटी 6376) मधून गायत्री स्पेशल बर्फी तसेच खवा घेवून ते निघून गेले. यावेळी त्यांनी कसलीही कागदोपत्री कारवाई न केल्याने ते तोतया असल्याचे समोर आले. त्यामुळे त्या संशयिताकडून फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर चालक धारगलकर याने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस निरीक्षक एन. एस. कदम या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: