Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुख्यात गुंड युवराज साळवेस पोलीस कोठडी
ऐक्य समूह
Thursday, September 05, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: re3
5मसूर, दि. 4 : पिंपरी, ता. कराड गावच्या हद्दीत दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना उंब्रज पोलिसांनी कारवाई करताना पोबारा केलेल्या व तीन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेला कुख्यात नामचीन गुंड युवराज साळवी यास दि. 2  सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी दिवशी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गजाआड केले होते.  दि.  3 सप्टेंबर रोजी युवराज साळवी यास पोलिसांनी पुणे येथील मोक्का न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने युवराज साळवी यास पाच दिवसांची पोलीस  कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
याबाबत माहिती अशी, की विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास के.,  जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते,  अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशान्वये उंब्रज पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दि. 15 जून रोजी सकाळपासून कोंम्बिंग ऑपरेशन व नाकाबंदी लावण्यात आली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक  अजय गोरड, सहाय्यक फौजदार संभाजी देशमुख, पोलीस हवालदार  सचिन देशमुख, पोलीस हवालदार संजय देवकुळे, ग्राम सुरक्षा दलाचे पोलीस मित्र नागेश पाटील असे पिंपरी, ता.  कराड गावच्या हद्दीत शहापूर फाटा लागतो तेथे थांबून चेकिंग करीत असताना रविवार, दि. 16 जून रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मसूर बाजूकडून कराड बाजूकडे निघालेल्या कारला हात दाखवून इशारा देऊन थांबवले. त्या कारमधील चालक त्याचे लगत पुढील बाजूस एक व मागील सीटवर तीन जण बसले होते. त्यांना संशयावरून गाडीची तपासणी करीत असतानाच ते कारचे दरवाजे उघडे सोडून कारमधून बाहेर आल्यानंतर त्यांच्याकडे  नाव, पत्त्यावर विचारणा करीत असताना त्यापैकी एक जण युवराज साळवे, रा. कोपर्डे हवेली हा गुंड असल्याचे व तो पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे लक्षात आले.
त्यावेळी पोलीस गाडीची तपासणी  करत असताना युवराज साळवे, सूरज आनंदराव पाटील (सुपने) व तीन अनोळखी पुरुष यांनी पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणत  शहापूर बाजूकडे पळून गेले. ते पळून का गेले असावेत म्हणून त्यांचेवरील संशय बळावल्याने त्यांचे ताब्यातील सोडून दिलेली कारची समक्ष पाहणी करता कारमध्येच डॅशबोर्डाचे डाव्या कप्प्यात एक पिस्टल जिवंत राऊंड व भरलेले लोड मॅक्झिन व युवराज साळवे यांचे लेदर पॉकेटमध्ये त्याचा फोटो, ओळखपत्र, प्लास्टिक कॅरीबॅग मध्ये मिरची पूड, मागील सीटवर काळ्या रंगाची पुमा कंपनीची सॅक  दिसून आली. तिची पाहणी करता त्यामध्ये एक गावठी कट्टा व जिवंत राऊंड भरलेल्या मॅक्झिनसह व सूरज आनंदराव पाटील (रा. सुपने) याच्या नावाचे ओळखपत्र व मनी पॉकेट व एक लाकडी दांडके दिसून आले. सदर वस्तूंचा पंचनामा करून सर्व ताब्यात घेण्यात आल्या आहेत.  यावरून युवराज सर्जेराव साळवी (रा. कोपर्डे हवेली, ता. कराड), सूरज पाटील (रा. सुपने, ता. कराड) व पंचवीस ते तीस वयोगटातील अनोळखी तिघे दरोडा घालण्याच्या तयारीत एकत्र फिरत असल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यापैकी सूरज सर्जेराव पाटील (सध्या राहणार मंगळवार पेठ, कराड)  व आकाश उर्फ पप्या साहेबराव कोळी (रा. माणिक चौक, उंब्रज, ता. कराड)   यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर उंब्रजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज साळवे टोळीविरोधात मोक्कांतर्गत प्रस्ताव तयार करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. त्यानुसार सदर टोळीवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून युवराज साळवी फरारी होता. सतत मागील तीन महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक कुंभार, उपनिरीक्षक प्रसन्ना जराड व कर्मचारी यांनी सापळा रचून दि. 2 सप्टेंबर रोजी विटा येथून युवराज साळवी यास ताब्यात घेतले होते. दि. 3 सप्टेंबर रोजी पुणे येथील मोक्का न्यायालयात युवराज साळवी यास हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सदर गुन्ह्याचा अधिक तपास प्रभारी पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात करत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: