Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हिंदुस्थान एरोनॉटिक्सला 83 लढाऊ विमानांसाठी 45 हजार कोटींचे कंत्राट
ऐक्य समूह
Saturday, September 07, 2019 AT 11:08 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 6 (वृत्तसंस्था) : मोदी सरकारने हिंदुस्थान एरोनॉॅटिक्स लिमिटेडला (कअङ) 83 लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी 45 हजार कोटींचे कंत्राट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व विमाने हलक्या वजनाची (लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट) असतील.
भारतीय वायुदलाने दोन वर्षांपूर्वीच या 83 विमानांसाठी निविदा काढली होती. मात्र, हिंदुस्थान एनरॉटिक्स लिमिटेडने यासाठी मागितलेली किंमत जास्त वाटल्याने हा प्रस्ताव रखडला होता. आता हा प्रस्ताव अखेर मार्गी लागला आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या किमतीविषयक समितीने या 83 विमानांच्या उत्पादनासाठी 45 हजार कोटींच्या खर्चाला नुकतीच मान्यता दिली.  यानंतर आता वायुदलाकडून लवकरच (कअङ) ला विमाननिर्मितीचे कंत्राट दिले जाईल, अशी माहिती लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी दिली. लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट प्रकारातील हे विमान संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून (डीआरडीओ) विकसित करण्यात आलेले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पहिल्यांदाच एखाद्या  भारतीय कंपनीला इतके मोठे कंत्राट मिळाले आहे. त्यामुळे देशांतर्गत संरक्षण साहित्यनिर्मितीच्या उद्योगाला मोठी चालना मिळेल. यामुळे 45 हजार कोटींपैकी 65 टक्के निधी हा देशातच राहणार आहे. तसेच या कंत्राटामुळे खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होईल.
या बॅचमधील पहिले विमान 2023 पर्यंत तयार होईल. हे विमान तेजस या विमानाची आधुनिक आवृत्ती असेल. या विमानांमध्ये अत्याधुनिक हवाई उपकरणे आणि रडारचा समावेश असेल. यापूर्वी हिंदुस्थान एरोनटिक्स लिमिटेडने वायूदलासाठी 16 विमानांची निर्मिती केली होती. ही विमाने सध्या तामिळनाडूच्या सुलूर येथे असणार्‍या 45 व्या स्क्वॉड्रनमध्ये तैनात आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: