Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चाकूचा धाक दाखवत सव्वालाख लंपास
ऐक्य समूह
Monday, September 09, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 8 ः सदरबझार येथील प्रसाद कॉलनीतील एका घरात मध्यरात्रीच्या सुमारास 2 अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. महिलेला चाकूचा धाक दाखवत तोंडाला रुमाल बांधून घरात घुसलेल्या 20 ते 25 वयोगटातील दोन चोरट्यांनी घरातील रोख रक्कम 1 लाख 24 हजार रुपये व महिलेच्या गळ्यातील नकली मंगळसुत्र चोरुन नेल्याची घटना घडली. चोरट्यांच्या या धाडसाने सदरबझार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत तनुजा सलीम शेख (वय 29), रा. प्रसाद कॉलनी, सदरबझार, सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 रोजी रात्री 11.30 च्या सुमारास जेवण झाल्यानंतर तक्रारदार महिलेचा पती बकरी हलाल करण्याच्या कामासाठी कसायाकडे निघून गेला. त्यानंतर महिला देखील आपल्या 2 मुली व मुलासमवेत झोपी गेल्या. रात्री 2 वाजण्याच्या सुमारास प्लास्टिक पिशवी वाजल्याचा आवाज आल्याने तनुजा शेख जाग्या झाल्या.
त्यावेळी त्यांच्यासमोर तोंडाला मास्क लावलेला इसम उभा होता. त्यामुळे शेख यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली असता चोरट्याने त्यांच्या गळ्याला चाकू दाखवत पैसे कोठे आहेत, असे खुणेने विचारले. या घटनेमुळे शेख भयभीत झाल्या होत्या. तेवढ्यात चोरट्याच्या दुसर्‍या साथीदाराने शेख यांच्या तोंडावर बेडशीट टाकले व पैसे शोधण्यास सुरुवात केली. चोरट्यांनी कापडी पिशवीतील रोख 1 लाख 20 हजार रुपये व देवासाठी डब्यात ठेवलेले रोख 4 हजार रुपये घेवून तेथून पोबारा केला. या घटनेनंतर शेख यांनी शेजारी नातेवाईक तसेच पतीला याबाबत माहिती सांगेेेपर्यंत चोरटे पळून गेले होते. याबाबतची तक्रार शेख यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी चोरीचा तपास सुरु केला आहे.

 
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: