Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अखेर ऑर्बिटरला विक्रम लँडरची माहिती मिळाली
ऐक्य समूह
Monday, September 09, 2019 AT 11:07 AM (IST)
Tags: mn1
5बेंगळुरू, दि. 8 (वृत्तसंस्था) : चंद्राच्या पृष्ठभागापासून काही अंतरावर असतानाच चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचा संपर्क तुटल्याने इस्त्रोच्या शास्त्रज्ञांसह सर्वांचे चेहरे उतरले होते. मात्र, काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर विक्रम लँडरचे ठिकाण शोधण्यात इस्त्रोला यश आले आहे. चंद्रावर विक्रम लँडरचे ठिकाण सापडले असून इस्त्रोचे प्रमुख के. सिवान यांनी ही आनंदवार्ता दिली आहे. ऑर्बिटरने लँडरचे फोटो काढले असून संपर्क झालेला नाही. आम्ही संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत, अशी माहिती के. सिवान यांनी ‘एएनआय’ला दिली.
देशवासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या ‘चांद्रयान-2’ मोहिमेच्या अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि उत्साहाने भरलेल्या ‘इस्रो’च्या मुख्यालयात निराशेचे मळभ पसरले होते. 7 सप्टेंबर रोजी एक वाजून 55 मिनिटांनी या चांद्रमोहिमेतील शेवटच्या 15 मिनिटांचा थरार सुरू असतानाच ‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटला होता. मात्र, इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला विक्रम लँडरचा संपर्क तुटला असला तरी पुढचे 14 दिवस विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल, असे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी शनिवारी स्पष्ट केले होते.
विक्रम लँडरशी संपर्क तुटल्यानंतरही भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेबद्दल जगभरातून इस्त्रोवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच ही भारतीयांना सुखद धक्का देणारी घडामोड घडली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील विक्रम लँडरचे ठिकाण आम्हाला सापडले आहे. ऑर्बिटरने विक्रम लँडरचे थर्मल इमेज काढल्या आहेत. मात्र, लँडरशी संपर्क झालेला नाही. आम्ही विक्रम लँडरशी संपर्क करण्याचे प्रयत्न करत आहोत. लवकरच संपर्क होईल, अशी माहिती के. सिवान यांनी दिली आहे.
इस्रोच्या  चांद्रयान-2 मधून आम्हाला प्रेरणा : नासा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे चांद्रयान-2 चंद्रावर उतरू शकले नाही; मात्र, इस्रोचे जगभरातून कौतुक होत आहे. अमेरिकेच्या नासाने भारताच्या प्रयत्नांचे कौतुकच नव्हे तर चांद्रयान-2 मोहीम ही आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.  
भविष्यात अंतराळ क्षेत्रात इस्रोसोबत काम करण्याची इच्छाही नासाने व्यक्त केली. अंतराळ संशोधन हे एक आव्हानात्मक क्षेत्र आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-2 उतरवण्याच्या इस्रोच्या प्रयत्नांचे आम्हाला कौतुक आहे. इस्रोच्या या मोहिमेतून आम्हाला प्रेरणा मिळाली आहे. भविष्यात अंतराळ क्षेत्रात इस्रोसोबत काम करण्याची संधी मिळेल अशी आशा आहे, असे ट्विट नासाने केले आहे. संयुक्त अरब अमिरातच्या अंतराळ संशोधन संस्थेनेही इस्रोचे कौतुक केले आहे. चांद्रयान-2 च्या विक्रम लँडरचा संपर्क तुटला. मात्र, आमचा इस्रोला पूर्ण पाठिंबा आहे असे आश्‍वासन आम्ही देतो. अंतराळ क्षेत्रातील महत्त्वाचा आणि शक्तिशाली घटक असल्याचे भारताने सिद्ध केले आहे. अंतराळ क्षेत्रातील विकासात भारताचा मोठा वाटा आहे, असे ट्विट या संस्थेने केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संशोधन संस्थेनेही इस्रोचे कौतुक केले आहे. इस्रोच्या प्रयत्नांचे आणि मोहीम सुरूच ठेवण्याच्या जिद्दीचे विशेष कौतुक वाटते, असे या संस्थेने ट्विटमध्ये म्हटले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: