Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
राज्यघटनेतील कलम 371 ला धक्का लावणार नाही : शहा
ऐक्य समूह
Monday, September 09, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: na3
5गुवाहाटी, दि. 8 (वृत्तसंस्था) : ईशान्य भारतातील राज्यांसाठी राज्यघटनेत असलेले कलम 371 कोणत्याही परिस्थितीत बदलण्यात येणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. आसाममध्ये झालेल्या ईशान्य भारत परिषदेत सहभागी होण्यासाठी ते आसाममध्ये आले आहेत.
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) ची अंतिम यादी जाहीर केल्यानंतर शहा हे पहिल्यांदाच आसाम दौर्‍यावर आले होते. यावेळी अमित शहा यांनी म्हटले, भारतीय संविधानातील कलम 371 चा भाजप सन्मान करते. भाजप सरकार या कलमात कोणत्याही स्थितीत बदल करणार नाही. कलम 370 हे अस्थायी कलम होते. तर, कलम 371 हे एका विशिष्ट संदर्भात असून दोन्ही कलमात फरक आहे. महाभारतातील बब्रूवाहन असो किंवा घटोत्कच हे दोन्ही ईशान्य भारतातील होते. तर, मणिपूरमध्ये अर्जुनाचा विवाह झाला होता. श्रीकृष्णाच्या नातवाचा विवाह ईशान्य भारतात झाला असल्याची आठवण त्यांनी करून दिली.
26 जानेवारी 1950 रोजी ईशान्येकडील राज्यांमध्ये कलम 371 लागू करण्यात आले. ईशान्येकडील 6 राज्यांसह देशातील 11 राज्यांमध्ये हे कलम लागू आहे. अनुच्छेद 371 ए नुसार नागालँडमधील नागरिकांशिवाय देशातील अन्य राज्यांमधील नागरिकांना त्या ठिकाणी जमीन विकत घेण्याचा अधिकार नाही. भारतात सर्वात अखेरीस सामील झालेल्या सिक्कीमलाही काही विशेषाधिकार देण्यात आले आहेत. 371 एफ नुसार सरकारला संपूर्ण राज्यातील जमिनीचा अधिकार देण्यात आला आहे. 
तसेच महत्त्वाची बाब म्हणजे सिक्कीमच्या विधानसभेचा कार्यकाळ चार वर्षांचा ठेवण्यात आला आहे. परंतु या ठिकाणी अद्यापही पाच वर्षांनीच निवडणुका पार पडतात. तसेच सिक्कीमशी निगडीत कोणताही वाद करार, ट्रीटी, एंगेजमेंट यामुळे निर्माण झाला असेल तर ते सर्वोच्च न्यायालय किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येणार नाही. गरज भासल्यास यामध्ये राष्ट्रपती मध्यस्थी करू शकतात, असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: