Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
माजी कायदामंत्री, ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे निधन
ऐक्य समूह
Monday, September 09, 2019 AT 11:11 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : माजी कायदामंत्री, ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांचे प्रदीर्घ आजाराने दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. गेल्या दोन आठवड्यापासून ते आजारी होते. देशातील सर्वोत्कृष्ट विधिज्ञांमध्ये त्यांची गणना होत होती. जेठमलानी यांनी बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्षपदही भूषविले होते.
राम जेठमलानी यांच्या मागे पुत्र आणि प्रसिद्ध वकील महेश जेठमलानी आणि अमेरिकेत राहणारी मुलगी असा परिवार आहे. त्यांची दुसरी कन्या राणी जेठमलानी यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. जेठमलानी यांची तब्येत खालावल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
वयाच्या 18 व्या वर्षी
झाले वकील
जेठमलानी यांचा ब्रिटिश राजवटीतील सिंध प्रांतातील शिकारपूर येथे 14 सप्टेंबर 1923 या दिवशी जन्म झाला. ते वयाच्या 18 व्या वर्षी वकील झाले. शाळेत शिकताना बढती मिळवत वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण केले. त्या काळात सर्वसाधारणपणे लोक वयाच्या 21 व्या वर्षी वकील होत. मात्र जेठमलानी यांनी ही कमाल 18 व्या वर्षीच करून दाखवली. ही माहिती स्वत: जेठमलानी यांनी 2002 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत दिली होती.
अफझल गुरूच्या
फाशीचा केला बचाव
जेठमलानी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्ये प्रकरणी बचाव पक्षाचे वकील या नात्याने मद्रास उच्च न्यायालयात 2011 मध्ये केस लढवली होती. तसेच त्यांनी शेअर बाजार घोटाळाप्रकरणी हर्षद मेहता याची बाजू मांडली होती. संसदेवर हल्ला करणार्‍या अफझल गुरुच्या फाशीच्या प्रकरणातही ते बचाव करत होते. बहुचर्चित जेसिकालाल हत्याकांड प्रकरणातही त्यांनी मनु शर्माची बाजू लढवली होती.
 वाजपेयीं विरुद्ध लढवली होती निवडणूक
2010 मध्ये जेठमलानी यांनी सुप्रिम कोर्ट बार असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती. सहाव्या आणि सातव्या लोकसभेत ते भाजपच्या तिकिटावर मुंबईतून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी वाजपेयी सरकारमध्ये केंद्रीय कायदामंत्री आणि नगरविकास विभागाचे मंत्रिपद भूषविले होते. 2004 मध्ये त्यांनी लखनऊमधून अटलबिहारी वाजपेयी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
राम जेठमलानी यांनी राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी ते चारा घोटाळा प्रकरणातील आरोपी लालूप्रसाद यादव यांचे खटले लढवले होते. याबरोबरच त्यांनी संसदेवरील हल्ल्याप्रकरणी अफझल गुरू तसेच सोहराबुद्दीन चकमक प्रकरणी अमित शहा यांचे खटलेही लढवले होते.
म्हणून जेठमलानी कायम आठवणीत राहतील : मोदी
ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या जाण्यामुळे भारताने असाधारण वकील गमावला असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी विचलित न होता त्यांनी लढा दिला होता. त्यासाठी ते कायम आठवणीत राहतील, अशा शब्दात मोदी यांनी जेठमलानी यांना श्रद्धांजली वाहिली.
जेठमलानी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण करत आठवणींना उजाळा दिला. जेठमलानी हे असे आदर्श व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी वकिली आणि संसद या दोन्हींमध्ये अमूल्य योगदान दिले. ते स्वभावाने धाडसी, विनोदी होते. तसेच ते कोणत्याही विषयावर बेधडकपणे मत मांडायचे. जेठमलानी यांचे एक वैशिष्ट्ये म्हणजे मनातील विचार मांडायची क्षमता. कोणतीही भीती न बाळगता ते बोलायचे. आणीबाणीच्या काळात लोकांच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी न डगमगता दिलेला लढा कायम स्मरणात राहील. असंख्यवेळा मला त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. या दुःखाच्या काळात माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंब, मित्र आणि चाहत्यांसोबत आहेत. ते आता आपल्यात नसले तरी त्यांनी केलेले काम सदैव सोबत राहील, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: