Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘महाबळेश्‍वर’ भारताची नवी चेरापुंजी
ऐक्य समूह
Monday, September 09, 2019 AT 11:32 AM (IST)
Tags: mn3
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : महाबळेश्‍वरसह परिसरात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच असून या वर्षीच्या हंगामात 300 इंच पाऊस झाला आहे. याबाबत ‘द वेदर चॅनेल इंडिया’ने देखील नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये मेघालयातील मॉसिनराम, चेरापुंजीपेक्षा महाबळेश्‍वरात अधिक पाऊस झाल्याचे नमूद केले आहे. या वर्षी येथे आजपर्यंत 7631 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जगात सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून मॉसिनराम, चेरापुंजी प्रसिद्ध आहे. परंतु या दोन्ही शहरांना मागे टाकत महाबळेश्‍वरने पहिला क्रमांक पटकावला आहे. हवामान विभागाने नुकतीच या बाबतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीनुसार यंदा मॉसिनराम शहरात आजपर्यंत साडेसहा हजार मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्‍वर शहरात साडेसात हजार मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तब्बल तेरा वर्षांनंतर 1 जून ते 8 सप्टेंबरअखेर येथे 300 इंच पावसाची विक्रमी नोंद झाली आहे. मागील वर्षी याच काळात येथे 237 इंच पावसाची नोंद येथे झाली होती.
कोकण, पश्‍चिम घाटात आणि मध्य महाराष्ट्रात महाबळेश्‍वर हे असे आगळं वेगळं गिरिस्थान आहे, की या ठिकाणी नेहमी सरासरी पेक्षा अधिक पावसाची नोंद होते. महाबळेश्‍वर येथे सदाहरीत घनदाट जंगल, उंच डोंगररांगा अशी भौगोलिक स्थिती आहे. येथे पावसाळ्यात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरलेली असते. अशा वातावरणात येथे वर्षा सहलीसाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात आणि पावसाचा आनंद लुटतात. यंदा देशातच नव्हे तर जगात सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून महाबळेश्‍वर शहराची नोंद झाली आहे.
सर्वांत जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून आजपर्यंत मेघालयातील चेरापुंजी ओळखले जाते. गेल्या काही वर्षांत थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेल्या महाबळेश्‍वरमध्ये चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ लागली आहे. त्याबाबतच्या नोंदीतून हे स्पष्ट होत आहे. ‘द वेदर चॅनेल इंडिया’ने देखील नुकत्याच केलेल्या ट्विटमध्ये महाबळेश्‍वर येथे चेरापुंजीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याचे नमूद केले आहे. यामध्ये एक जूनपासून नोंदविलेल्या नोंदीनुसार महाबळेश्‍वरमध्ये सर्वाधिक पाऊस पडल्याचे नमूद केले आहे. महाबळेश्‍वरमध्ये पडणार्‍या पावसामुळे कोयना धरणातील पाणी पातळी वाढते तर चिपळूण, महाडसह कोकणातील काही भागावर या पावसाच्या पाण्याचा परिणाम होतो.  
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: