Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आसामच काय कुठल्याही राज्यात घुसखोरांना स्थान नाही
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 11:00 AM (IST)
Tags: na1
5गुवाहाटी, दि. 9 (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी गुवाहाटी येथील ईशान्य लोकशाही आघाडी (नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स) च्या मेळाव्याप्रसंगी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीकास्र सोडले. काँग्रेसने कायमच ईशान्य भारताला देशापासून वेगळे पाडले असल्याचा त्यांनी आरोप केला. एनआरसीवरून बोलताना केवळ आसामच काय कुठल्याही राज्यात घुसखोरांना स्थान नाही, असेही त्यांनी  यावेळी सांगितले.
ते म्हणाले, प्रत्येक राज्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे  ही भावना तळागळापर्यंत पोहोचवण्यासाठी ईशान्य भारताला काँग्रेसमुक्त बनवणे महत्त्वाचे होते. आज मी हे आनंदाने सांगू शकतो, की ईशान्य भारतातील आठही राज्य ‘एनईडीए’ बरोबर आहेत. काँग्रेसने ईशान्य भारतात कायमच फोडा आणि राज्य करा ही नीती अवलंबवली व संपूर्ण देशापासून ईशान्य भारतास वेगळे पाडले आहे.
स्वातंत्र्यानंतर 2014 पर्यंत काँग्रेसने ईशान्य भारतात भाषा, जात, संस्कृती, हद्दी या मुद्द्यांवरून भांडणं लावली. यामुळे संपूर्ण ईशान्य भारत कायमच अशांत राहत होता. या ठिकाणी विकास करण्याऐवजी भ्रष्टाचार केला गेला. येथील दहशतवादाची समस्या सोडवण्याऐवजी काँग्रेसने त्याला वाढीसाठी पोषक वातावरण तयार केले व आपले राज्य कायम राहील यासाठी तेढ निर्माण करा व राज्य करा हे धोरण अवलंबवले असल्याचाही त्यांनी आरोप केला.
‘एनआरसी’च्या मुद्द्यावरून बोलताना ते म्हणाले, ईशान्य भारतातील राज्यांनी एनआरसीवर चिंता व्यक्त केली आहे. कारण मोठ्या प्रमाणात नागरिक यातून वगळले गेले आहेत व अधिक गांभिर्याने यावर काम झाले पाहिजे असे सांगितले जात आहे. मात्र मी आश्‍वासन देतो, की एकही घुसखोर आसाममध्ये राहणार नाही व अन्य राज्यांमध्येही घुसखोरी करू शकणार नाही. आम्ही केवळ आसामला नाहीतर संपूर्ण देशालाच घुसखोरीपासून मुक्त बनवू इच्छित आहोत. कधी काळी आम्ही असे ऐकून होतो, की ईशान्य भारताची ओळख ही दहशतवाद, घुसखोरी, ड्रग्स, भ्रष्टाचार, दंगली अशी होती. मात्र आता या ठिकाणी मागील पाच वर्षांत आम्ही विकास, कनेक्टिविटी, मूलभूत सुविधा, क्रीडा व शांतीच्या दिशेने वाटचाल करत आहोत. 
यावेळी त्यांनी कलम 371 ला केंद्र सरकार धक्का लावणार नसल्याचेही पुन्हा एकदा येथील लोकांना आश्‍वासन दिले. ते म्हणाले, कलम 370 मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. तर कलम 371 ही विशेष तरतूद आहे. हा ईशान्य भारताचा अधिकार आहे याला कोणीही धक्का लावणार नाही. कलम 370 आणि कलम 371 या दोन्हींमध्ये मोठा फरक आहे. आज सीमेवर जी देशविरोधी
कृत्य घडत आहेत, त्या विरोधात केंद्र सरकार कठोर पावले उचलणार आहे. ड्रग्स, हत्यारांसह मानवी तस्करीविरोधात केंद्र सरकार अधिक कठोर होणार आहेे.
ईशान्य भारतातील आठही राज्यांनी ‘एनईडीए’ ला स्वीकरले असल्याचे सांगत शहा म्हणाले, 25 लोकसभांपैकी 19
लोकसभेच्या जागांवर एनईडीएने विजय मिळवला आहे. आम्ही छोट्या-छोट्या पक्षांची भावना लक्षात घेऊन त्यांना एनईडीएशी जोडले आहे. ईशान्य भारत हा देशाच्या फुफ्फसांप्रमाणे आहे. कारण या ठिकाणचा 26 टक्के भाग हा वन्य भाग आहे. जो देशाला ऑक्सिजन देण्याचे काम करतो.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: