Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटण-दहिवडी रस्त्यावर ट्रक चालकाला लुटले
ऐक्य समूह
Tuesday, September 10, 2019 AT 11:17 AM (IST)
Tags: re3
दोन संशयित ताब्यात
5फलटण, दि. 9 : फलटण-दहिवडी रस्त्यावर ट्रक अडवून चालकास मारहाण करुन ट्रकमध्ये ठेवलेली 23 हजार रुपयांची रक्कम 2 दुचाकीवरुन आलेल्या 4 अज्ञात इसमांनी नेल्याची फिर्याद ट्रक चालक राजू मुन्शीलाल शिवहरी (वय 32), रा. सिटी कोतवाली, जि. भिंड (उत्तरप्रदेश) यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
याबाबत शहर पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, ट्रक चालक राजू मुन्शीलाल शिवहरी हा आपल्या ताब्यातील ट्रक (यूपी 92 टी 9667) घेऊन दहिवडीहून फलटणकडे येत असताना आज पहाटे 3 च्या सुमारास झिरपवाडी गावच्या हद्दीत वर्षा धाब्यापाठीमागे दोन मोटार- सायकलवरील 4 इसमांनी दुचाकी आडवी लावून ट्रक थांबवला व ते केबिनमध्ये घुसले. त्यांनी चालकाला मारहाण करुन सीट खाली ठेवलेले 23 हजार रुपये घेऊन दहिवडी बाजूकडे धूम ठोकली. त्यानंतर चालक ट्रक घेवून फलटणकडे रवाना झाला. तो कोळकी येथे पोहोचला असता समोरुन शहर पोलीस ठाण्याची पीसीआर मोबाईल व्हॅन आली. तिला थांबवून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी दहिवडीकडे रवाना झाले.
झिरपवाडी गावच्या हद्दीत दुचाकीवरील दोघे एका टेम्पोचा पाठलाग करत असल्याचे लक्षात आल्यावर पीसीआरने त्यांचा पाठलाग केला असता ते मुख्य रस्ता सोडून कच्च्या रस्त्याकडे गेले. तरीही पाठलाग सुरु ठेवून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले. दुसरा पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्यालाही ताब्यात घेण्यात आले. शंकर वसंत पवार (वय 35) आणि दिनेश राजेश पवार (वय 35), दोघे रा. सोमवार पेठ, फलटण अशी या संशयितांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. आणखी दोघा संशयितांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. फलटण-दहिवडी रस्त्यावर वरच्यावर अडवणूक व लूटमार होत असल्याने जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मार्गावर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक प्रताप पोमण व सहकार्‍यांनी रात्र गस्त सुरु ठेवली होती. दुधेबावीचे गाव कामगार पोलीस पाटील हनुमंतराव सोनवलकर व त्यांच्या पोलीस मित्र टीमनेही या मार्गावर रात्र गस्त सुरु केली आहे. पोलीस निरीक्षक बनकर तपास करीत आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: