Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विक्रम लँडरशी अद्याप संपर्क नाही : इस्रो
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 11:14 AM (IST)
Tags: na3
5बेंगळुरू, दि. 10 (वृत्तसंस्था) : चंद्राच्या भूमीवर सुरक्षित असलेल्या विक्रम लँडरशी अद्यापही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) ट्विटद्वारे दिली आहे. विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभूमीवर आडव्या स्थितीत पडला असल्याची माहिती सोमवारी इस्रोच्या हाती लागली होती. ऑर्बिटरने पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये विक्रम लँडर सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले असल्याचे इस्रोने स्पष्ट केले होते. विक्रम लँडरची कोणत्याही प्रकारची तूटफूट झाली नसल्याचे या छायाचित्राद्वारे स्पष्ट झाले. यानंतर शास्त्रज्ञांनी विक्रमशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले.
22 जुलै या दिवशी प्रक्षेपण झाल्यानंतर ‘चांद्रयान-2’ 47 दिवसांचा प्रवास करत आणि सर्व अडथळे पार करत चंद्राच्या जवळ पोहोचले होते. 6-7 दरम्यानच्या रात्री विक्रम लँडरसह रोव्हक प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरले. 
मात्र चंद्राच्या भूमीपासून 2.1 कि.मी.च्या अंतरावर असताना विक्रम लँडरशी असलेला संपर्क तुटला.
मात्र, ‘चांद्रयान-2’ ने आपले 95 टक्के लक्ष्य प्राप्त केल्याचे इस्रो आणि सर्व शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे. ‘चांद्रयान-2’च्या ऑर्बिटर पुढील सात वर्षे चंद्राची परिक्रमा करत माहिती पुरवणार आहे आणि हेच चांद्रयान-2 मोहिमेचे मोठे यश असल्याचे मानले जात आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग
सर्वात कठीण : युरोपियन स्पेस एजन्सी
भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेप्रमाणे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने सुद्धा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवरहित मोहिमेची आखणी केली होती. 2018 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडर उतरवण्याची त्यांची योजना होती. पण पुरेशा निधीअभावी त्यांना आपली नियोजित मोहीम रद्द करावी लागली. या मोहिमेची आखणी करताना चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यामध्ये काय धोके आहेत त्यासंबंधी अहवाल तयार करण्यात आला होता. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर खूप कठीण वातावरण आहे. येथे निकाल खूप अनपेक्षित, धोकादायक आणि आश्‍चर्यकारक असू शकतो, असे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेच्या अहवालात म्हटले होते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील धूळ उपकरणांना चिकटू शकते. त्यामुळे यांत्रिक बिघाड उद्भवू शकतो. सोलार पॅनलवर सुद्धा त्याचा परिणाम होईल. त्यामुळे त्या उपकरणांची क्षमता कमी होईल, असे या अहवालात म्हटले होते.
चंद्रावर शेवटचे पाऊल ठेवणार्‍या यूजीन सेर्नान यांनी चंद्रावरील धुळीसंदर्भात भाष्य केले होते. ईएसएच्या अहवालात त्यांच्या वक्तव्याचा दाखला आहे. युरोपियन अवकाश संशोधन संस्था आता कॅनडा आणि जपानच्या अवकाश संशोधन संस्थेसोबत मिळून हेरॅकल्स रोबोटिक मिशनवर काम करत आहे. 2020 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंगची ही मोहीम आहे. नासाची 2024 मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मानवी मोहिमेची योजना आहे. या मोहिमेची आखणी करताना नासा चांद्रयान-2 मोहिमेचा अभ्यास करेल. दक्षिण ध्रुवावर लँडिंगमध्ये 17 प्रकारचे धोके आहेत. सॉफ्ट लँडिंग यशस्वी ठरले असते तर अमेरिका, रशिया, चीननंतर अशी कामगिरी करणारा भारत जगातील चौथा देश ठरला असता. भारताव्यतिरिक्त कुठल्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे लँडिंग यशस्वी ठरले असते तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणारा भारत पहिला देश ठरला असता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: