Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाहन उद्योगावर बीएस-6, ओला-उबरचा परिणाम : अर्थमंत्री सीतारमन
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 11:13 AM (IST)
Tags: na3
जीडीपीतील चढ-उतार हा विकास प्रक्रियेचा भाग
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : देशातील वाहन उद्योगावर सध्या बीएस-6 बरोबरच ओला-उबर कंपन्यांच्या वाहनांच्या वाढत्या वापराचा परिणाम झाला असल्याचे दिसत आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. नवी वाहने खरेदी करण्यापेक्षा ओला-उबरच्या वाहनाचा वापर बरा, अशी लोकांची सध्या मानसिकता झाल्याचे दिसत असल्याने वाहन उद्योगासमोर अडचणी निर्माण झाल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
चेन्नई येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी  जीडीपीतील चढ-उतार हा विकास प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले. तसेच केंद्र सरकार देशभरातील आर्थिक मंदी घालवण्यासाठी प्रयत्नशील असून विकास दर वाढवण्यासाठी उपाययोजना करत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी तिमाहीत जीडीपीच्या आकडेवारीत वाढ होईल यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूकही वाढवली असल्याचे त्यांनी सांगितले. 
सरकार वाहन उद्योग क्षेत्रामधील मंदीबाबत गंभीर आहे. ऑटो कंपोनंट इंडस्ट्रीच्या मागण्यांबाबतही विचार केला जात आहेे. शिवाय घर खरेदी करणार्‍यांच्या मागण्यांवर देखील सरकार उपाय शोधत आहेत. आर्थिक मंदीमुळे देशातील वाहन उद्योग संकटात सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाहनांची विक्री घटत चालली असून  वाहन कंपन्यांकडून रोजगार कपात केली जात आहे. भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या फेर्‍यात अडकत चालली असून  देशाचा जीडीपी (विकास दर) पाच टक्क्यांवर आला आहे. अर्थव्यवस्थेवर ओढवलेल्या आर्थिक संकटावरून काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सरकारवर टीका केली होती. सरकारच्या चुकीमुळे अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. सरकारने घेतलेल्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची ही अवस्था झाली आहे, अशी टीका करत यातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी सरकारने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन सिंग यांनी केले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: