Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे बंद
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 11:01 AM (IST)
Tags: re1
मूळगाव व नेरळे पूल वाहतुकीसाठी खुले
5पाटण, दि. 10 : कोयना धरण परिसरात पावसाचा जोर मंदावला असून धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर घटल्याने धरणाच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर सोडण्यात येणारे पाणी मंगळवारी बंद करण्यात आले. सध्या केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत घट होवून विस्कळीत झालेले जनजीवन आता पूर्वपदावर आले आहे.  
दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या पार्श्‍वभूमीवर हे पाणी बंद करण्यात आल्याने या दिवशी विसर्जित होणारे घरगुती व गणेश मंडळांच्या मूर्तींचे पाण्यात विसर्जन करण्यासाठीच्या नैसर्गिक अडचणी दूर झाल्या आहेत. यामुळे गणेशभक्त, मंडळांचे कार्यकर्ते व सभासद यांच्यात समाधान व्यक्त होत आहे. परिणामी प्रशासनासह पोलीस यंत्रणाचाही ताण कमी झाला आहे. तर मूळगाव व नेरळे पुलावरील पाणी ओसरून दोन्ही पूल वाहतुकीसाठी खुले झाले आहेत. कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर मंदावल्याने धरणात येणार्‍या पाण्याचे प्रमाण त्याच पटीत घटले. सध्या धरणात सरासरी प्रतिसेकंद 22 हजार 162 क्युसेक्स पाणी येत आहे. धरणात सध्या 103.40 टीएमसी पाणीसाठा झाला असून ज्या पाण्याची आवक होत आहे त्याचा वीजनिर्मितीसाठी वापर, पूर्वेकडे पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सोडण्यात येणारे पाणी व अजून शिल्लक असलेली जवळपास दोन टीएमसी पाणी साठवण क्षमता याचा विचार लक्षात घेता सोमवारी रात्री धरणाचे सहा वक्री दरवाजे आधी चार फुटांवरून तीन फूट करण्यात आले होते. मंगळवारी पुन्हा येणार्‍या पाण्याचे प्रमाण अधिकच कमी झाल्याने सकाळी हे दरवाजे दोन फूट करण्यात आले. तर दुपारी बारानंतर हे दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले.  केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक्स इतकेच पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा 98.40 टीएमसी व पाण्याची उंची 2162 फूट 1 इंच इतकी झाली आहे. मंगळवार दि. 10 रोजी सायंकाळी 5 पर्यंत कोयनानगर येथे 26 (6659), नवजा 41 (7708) तर महाबळेश्‍वर येथे 17 (6696) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अतिपर्जन्यवृष्टी पडणार्‍या क्षेत्रातील प्रतापगड येथे 14 (6245), सोनाट 10 (5541), वळवण 8 (7407), बामणोली 2 (4486) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: