Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात विधानसभा निवडणूक रणनीतीबाबत चर्चा?
ऐक्य समूह
Wednesday, September 11, 2019 AT 11:12 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्ली येथील 10, जनपथ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना ही भेट खूप महत्त्वाची मानली जात आहे. या दोघांमध्ये जवळपास दीड ते दोन तास चर्चा सुरू होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक कधीही लागू शकते. त्याच संदर्भात सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करण्यासाठी शरद पवार दिल्ली या ठिकाणी गेले असल्याची चर्चा आहे. या दोघांमध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत काय करायचे याबाबतचा खल झाला असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना भाजपने आस्मान दाखवले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस, राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेमंडळी भाजप-शिवसेनेत प्रवेश करत असल्यामुळे या दोन्ही पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसण्याची चिन्हं आहेत. या सगळ्या परिस्थितीत निवडणूक, रणनीती या दोन्ही याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली होती तसेच राष्ट्रवादीलाही पराभवाचा सामना करावा लागला होता. आता महाराष्ट्रात काही नवी खेळी खेळायची असेल तर त्यासाठी काय काय पर्याय असतील यावर या दोघांमध्ये चर्चा झाल्याचेही समजते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: